File Photo : Death
हिंगोली : वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे घराची भिंत अंगावर कोसळून वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. नामदेव घनशाम गजभार (वय ६५) असे यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणी कुरुंदा पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत नोंद झाली नाही.
वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे नामदेव गजभार हे पत्नी व एका मुलासह राहतात. या परिसरात मागील दोन दिवसांपासून हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे गजभार यांच्या घराच्या मातीच्या भिंतीमध्ये पाणी मुरल्याने भिंत फुगली होती. सकाळी आठच्या सुमारास गजभार हे घरासमोर उभे असताना अचानक त्यांच्या अंगावर भिंत कोसळली. यावेळी मोठा आवाज झाल्याने परिसरातील गावकरी मदतीसाठी धावत आले. त्यांनी गजभार यांना बाहेर काढले.
या घटनेत ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर गावातच प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच कुरुंदा पोलिस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. गजभार यांच्यावर कुरुंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली आहे. रात्री उशीरापर्यंत कुरुंदा पोलिस ठाण्यात नोंद झाली नाही.