कोणी कितीही एकत्र येऊ द्या, काही करू द्या, पण...; भाजपच्या बड्या नेत्याने व्यक्त केला विश्वास
पुणे : विरोधकांनी पराभवाची कारणे शोधणे सुरु केले असले तरीही स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपाप्रणित महायुतीच जिंकणार असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मतदार याद्यांवरून गोंधळ घालण्याचे काम विरोधक करत असले तरी त्यात अर्थ नाही. दुबार नावे आहेत, मयत व्यक्तींचीही नावे काढली गेलेली नाहीत, हे जरी खरे असले तरी त्याचा कोणताही परिणाम निकालावर होऊ शकत नाही, असे सांगून बावनकुळे म्हणाले की ज्या निवडणुकात विरोधी पक्षांचे नेते-कार्यकर्ते जिंकतात, तेथेही याच मतदार याद्या असतात हे त्यांनाही चांगलेच ठाऊक आहे.
याद्या दुरुस्तीची प्रक्रिया मतदार याद्यांचे जेंव्हा पूर्ण शुद्धीकरण होईल तेंव्हाच शक्य आहे, असे महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले. पुढे बोलतांना बोलताना बावनकुळे म्हणाले की, आपल्या निवडणूक नियमांत फॉर्म सहाची प्रक्रिया सोपी असते. जेंव्हा नव्याने मतदारसंघात नाव नोंदवायचे असते तेंव्हा फॉर्म सहा भरला जातो. त्याला निवासाचा पुरावा जोडला की काम होते. नाव चढते. पण त्याच वेळी त्या मतदाराचे आधी दुसऱ्या ठिकाणी नोंदलेले नाव कमी करण्यासाठी द्यावा लागणाऱ्या फॉर्म सातची प्रक्रिया हे अतिशय जिकीरीची व वेळखाऊ असते. ती करायला मतदार जातच नाही. ज्याचे नाव कमी करायचे आहे त्याने स्वतः फॉर्म सात भरायचा असून, तो निवडणूक अधिकाऱ्याने तपासायचा, त्याला दोन वेळा हिअरिंग द्यायचे, असे सारे केल्यावर नाव कमी करता येते. ते करायला मतदार जुन्या मतदारसंघात वारंवार जात नाहीत. म्हणूनच मतदार संख्या वाढलेली दिसली तरी प्रत्यक्षात ती कमी असते. एकेका जिल्हयात अशी लाखभर नावे असणे शक्य आहे. पण तिथल्या सर्व पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांना याची माहिती असतेच, असेही बावनकुळे म्हणाले.
जनहिताच्या कामांमुळे आम्हाला पाठिंबा
बावनकुळे म्हणाले की, कायद्यानुसार लोकसभेची यादी विधानसभेला वापरली जाते. विधानसभेचीच मतदार यादी कायद्यानुसार राज्य निवडणूक आयोग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरतो. राज्य आयोग स्वतः मतदारयादीत नावे वाढवू वा कमी करू शकत नाही. स्थानिकच्या निवडणुका संपल्या नंतर जेंव्हा बिहार प्रमाणे महाराष्ट्रातही मतदार याद्यांची सखोल व तीव्र तपासणी मोहीम – एसआयआर – केंद्रीय निवडणूक आयोग घेईल तेंव्हाच याद्या खऱ्या अर्थाने दुरुस्त होतील. नव्याने तयार होतील. तोवर जर विरोधक यादीचे कारण दाखवून निवडणुका नको म्हणत असतील तर तो त्यांचा पराभवाची कारणे शोधण्याचा प्रयत्न असेल, अशी टिप्पणी करून बावनकुळे यांनी स्पष्ट केले की कोणीही कितीही एकत्र येऊ द्या, काही करू द्यात, पण महाराष्ट्रातील मतदाराने महायुती सरकारचे काम पाहिले आहे. जनहिताचे निर्णय पाहिले आहेत. त्यामुळे स्थानिक निवडणुकांतही आम्ही ५१ टक्के मते घेऊन विजयी होणारच, असा विश्वास वाटतो अशी भावनाही बावनकुळे यांनी व्यक्त केली.