
गुंड बंडू आंदेकरने भरला उमेदवारी अर्ज
पोलिस बंदोबस्तात भरला अर्ज
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आंदेकर तुरुंगात
पुणे: सध्या राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यात सुरुवात झाली आहे. दरम्यान पुणे शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यात चक्क आज एका गुंडाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गुंड बंडू आंदेकर याने पोलिस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चेला उधाण आले आहे.
बंडू आंदेकर साध्य आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आज कुख्यात गुंड बंडू आंदेकर आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पोलिस संरक्षणात त्याला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आणण्यात आले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी त्याने चमकेगिरी करण्याचा देखील प्रयत्न केला.
कोर्टाच्या परवानगीनंतर बंडू आंदेकरने उमेदवारी अर्ज भरल्याचे समजते आहे. मात्र कोर्टाने त्याच्यावर रॅली, प्रचार, भाषणे किंवा मिरवणूक करण्यासाठी प्रतिबंध घातलेला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तातच उमेदवारी अर्ज दाखल करण्याची परवानगी त्याला कोर्टाने दिली होती.
बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक
कुख्यात गुंड आंदेकर टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत. आयुष कोमकरच्या खुनानंतर आंदेकर टोळीचे अनेक कारनामे समोर येत आहेत. अशातच आता नाना पेठेतील जमिनीचा बळजबरीने ताबा घेऊन त्यावर बेकायदा बांधलेल्या इमारतीत भाडेकरू ठेवून पाच कोटी ४० लाख रुपये खंडणी उकळल्याप्रकरणी बंडू आंदेकरला समर्थ पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात न्यायालयाने बंडू आंदेकरला २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
Bandu Andekar Arrest : बंडू आंदेकरला दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक; नेमकं प्रकरण काय?
याप्रकरणी भवानी पेठेतील व्यावसायिकाने समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ७०, रा. नाना पेठ) आणि मनेष उर्फ मनोज चंद्रकांत वर्देकर (वय ५६, रा. कस्तुरे चौक, गुरुवार पेठ) या दोघांवर खंडणी उकळणे, अतिक्रमण करणे या भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
जमिनीच्या विकसनासाठी तिचा ताबा सोडावा अशी मागणी जागामालकाकडे बंडू आंदेकरकडे केली होती. त्याबदल्यात दोन दुकाने किंवा दीड कोटी रुपये आणि महापालिकेच्या कामासाठी तीस लाख रुपयांची खंडणी आंदेकरने मागितली; तसेच खंडणी न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.