बारामतीत विमानाचा अपघात; उड्डाणावेळी चाकात बिघाड झाला अन्…
बारामती : राज्यासह देश आणि विदेशात गेल्या काही महिन्यापासून अनेक विमानाचे अपघात झाले आहेत. गेल्या काही दिवसाखाली अहमदाबादमध्येही मोठी दुर्घटना घडली होती. अशातच आता बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये विमानतळावर पायलट प्रशिक्षण देणाऱ्या रेड बर्ड एव्हिएशन कंपनीच्या चार्टर्ड विमानाच्या टायरमध्ये बिघाड झाल्याने अपघात झाला, सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. बारामती विमानतळावर शनिवारी (दि ९ ) सकाळी पावणे आठ वाजता बारामती येथील रेड बर्ड एव्हीएशन या खासगी विमान प्रशिक्षण संस्थेच्या विमानाचा अपघात झाला आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, पायलट विवेक यादव यांनी विमान उड्डाण केले. मात्र थोड्या उंचीवर गेल्याने पुढील चाकात तांत्रिक बिघाड झाल्याने ते निखळले असल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यामुळे त्यांनी एमर्जेसची लँडिंग करण्याचा निर्णय घेतला आणि लँडिंग केले. मात्र यात विमानाच्या पंखांचे नुकसान झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या अपघाताची माहिती मिळताच कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ते विमान बाजूला केले आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झालेली नाही. याआधीही या ठिकाणी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र या अपघातामुळे बारामतीतील नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर यांनी काही दिवसांपूर्वी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांना देखील निवेदन देऊन या संस्थेवर कारवाईची मागणी केली होती. बारामतीचे नागरिक सुरक्षित नाहीत. उद्या जर एखादे विमान कोणाच्या घरावर किंवा कंपनीवर कोसळले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल सोलनकर यांनी केला आहे.
अहमदाबादमध्ये विमान अपघात
गेल्या काही महिन्याखाली अहमदाबादमध्ये विमान दुर्घटना घडली. जून महिन्यात भीषण विमान अपघात झाला होता. एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदांमध्ये एका हॉस्टेलवर कोसळले होते. या अपघातात 265 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचाही समावेश होता. लंडनसाठी निघालेल्या या विमानात 50 पेक्षा अधिक ब्रिटीश नागरिकांनीही आपला जीव गमावला होता. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा विमान अपघात होता. या घटनेनंतर डीजीसीएने विमानांच्या चाचणीबाबत महत्वाचे निर्देश दिले होते. मात्र त्यानंतरही अनेक विमानांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समोर आले आहे.