सागरी मासेमारी संकटाच्या जाळ्यात (फोटो- istockphoto)
समुद्रात शेकडो परप्रांतीय नौका
पापलेटचे दर्शन दुर्मीळच झाले
अनेक पुरक उद्योग धोक्यात…
रत्नागिरी: परप्रांतीय अत्याधुनिक मच्छीमार नौकांची घुसखोरी, धोक्याच्या इशाऱ्यामुळे मासेमारी वरचेवर बंद राहू लागली आहे. मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या स्थानिक नौकांना मासळी मिळेनासी झाली आहे. महाराष्ट्रासह रत्नागिरी जिल्ह्यातील मासेमारी व्यवसायाला घरघर लागल्याने भारतीय अर्थव्यवस्थेत या व्यवसायाचे प्रतिबिंब धूसर होऊ लागले आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या महाराष्ट्राच्या सागरी मासेमारीला विविध कारणांमुळे उत्तरती कळा लागली आहे.
हवामान बदलास्सह पर्ससीन, ट्रोलिंग, एलईडी पद्धतीच्या बेसुमार मासेमारीसह समुद्रातील वाढते प्रदूषण व इतर कारणांमुळे मासेमारीचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी. चा सागरी किनारा लाभला असून जिल्ह्यात ३ हजार ३८७ मच्छीमार नौका आहेत, यामध्ये सुमारे ३९० पर्ससीन आणि मिनी पर्ससीननौका आहेत. दरवर्षी १ सप्टेंबर रोजी मासेमारीसाठी पर्ससीननौका समुद्रात जातात. यावर्षी पावसाळा लांबल्याने नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पूर्ण क्षमतेने मासेमारी सुरु झाली. त्यानंतर चक्रीवादळांचा धोका, मतलई वारे आणि समुद्रात उसळणाऱ्या मोठ मोठ्या लाटांमुळे नौका मालकांनी स्वतःहुन मासेमारी बंद ठेवली.
समुद्रात शेकडो परप्रांतीय नौका
गोवा, मलपी, गुजरात, कर्नाटकच्या अनेक अत्याधुनिक नौका जिल्ह्याच्या समुद्रात मासेमारीसाठी घुसखोरी करत आहेत, परप्रांतीय एका नौकेचे क्षमता स्थानिक १० नौकांच्या बरोबरीची असते. शेकडो परप्रांतीय नौका समुद्रातील लहान मोठा मासा खरडवून नेत आहेत. खोल समुद्रात या परप्रांतीय नौका एलईडी मासेमारीसुद्धा करतात. मतलई वाऱ्यांमुळे सध्या पर्ससीन नौकांना मासळी मिळत नाही. या नौका समुद्रातून बंदरात परत येतात. मासळी मिळत नसल्याने पारंपरिक फिशिंग आणि रापण नौका बंद होण्याच्या मार्गावर आहेत, नौकेला मालकांना मासेमारीसाठी ६० ते ७० हजार रुपये खर्च येतो. यामध्ये खलाशी, तांडेल, पागी यांचे जिन्नस, इंधन, पाणी, बर्फ आदी खर्चाचा समावेश आहे. परप्रांतीय नौका एकदा समुद्रात मासेमारीसाठी आल्या की महिनाभर मासेमारी करून बंदरात जातात. त्यामुळे परप्रांतीय अद्यावत एक नौका स्थानिकांच्या १० नौकांचा मासा किंवा मासळी उद्योग हिरावून नेत आहेत.
Nitesh Rane: “राज्यातील मत्स्योत्पादन वाढीसाठी…”; मंत्री नितेश राणेंचे निर्देश
अनेक पूरक उद्योग धोक्यात…
जिल्हातील मासेमारीवर बर्फ, टेम्पो, बंदरावरील विचिच दुकाने असे अनेक पुरक उद्योग अवलंबून आहेत, मासेमारीच अडवणीत आली असल्याने पुरक उद्योगही धोक्यात आले आहेत. या सर्व घडामोडीचा परिणाम स्थानिक पातळीवर मिळणाऱ्या मासळीच्या दरावरसुद्धा होत आहे, त्यामुळे समुद्र असतानाही येथील खवय्याना चक्रचादराने मासळी विकत घेण्याची वेळ आली असल्याचे अनेक नौका मालकांनी सांगितले.






