मुंबई: राज्याच्या सागरी सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाय योजना आणि सागरी किनाऱ्यावरील अवैध धंद्यांवर करण्यात आलेली कारवाई यामुळे राज्यातील सागरी मत्स्योत्पादनामध्ये तीन हजार मेट्रिक टन वाढ झाल्याची माहिती मत्स्योत्पादन व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी विधानपरिषदेत दिली. नियम २६० अन्वये मांडण्यात आलेल्या प्रस्तावास उत्तर देताना मंत्री राणे बोलत होते.
सागरी सुरक्षा आणि मत्स्योत्पादन वाढ या दोन गोष्टीवर शासन लक्ष केंद्रित करून काम करत असल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, गस्ती नौकांच्या माध्यमातून १ हजार १६५, ड्रोनच्या माध्यमातून १ हजार ८०३, आणि पावसाळी मासेमारी उल्लंघन प्रकरणी ३६ याप्रमाणे गेल्या आठ महिन्यात कारवाई करण्यात आली आहे. मासेमारीला १०० टक्के कृषी दर्जा देणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य आहे. मिरकर वाडा, रत्नागिरी येथे २२ कोटी रुपयांची कामे सुरू करण्यात येत आहेत.
कोकणातील प्रवास सोपा व्हावा यासाठी ‘एम टू एम’ रो रो सर्व्हिस येत्या १५ दिवसात सुरू करण्यात येत आहे. तारापूर मत्स्यालयासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून जागतिक दर्जाचे मत्स्यालय तयार करण्यात येणार आहे. रोजगार निर्मितीवर भर देण्यात येत असून वाढवण बंदरासाठी लागणाऱ्या कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी सामंजस्य करार करण्यात आला असून ‘आय टी आय’ मध्ये या विषयी कोर्स सुरू करण्यात येत असल्याचेही मंत्री राणे यांनी सांगितले.
मंत्री नितेश राणेंचे अधिकाऱ्यांना निर्देश
कारंजा, आनंदवाडी, मिरकरवाडा व ससून डॉक येथील बंदरे ही कोकणाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असून यातून तेथील लोकांच्या आर्थिक विकासास चालना मिळेल. या बंदरांच्या ठिकाणी सुरू असलेली विकासकामे गती व पारदर्शकतेने पूर्ण करा, अशा सूचना मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.
मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाची आढावा बैठक मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला विभागाचे आयुक्त किशोर तावडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अविनाश पाठक, उपसचिव जकाते, सह आयुक्त दिनेश देवरे, प्रादेशिक उपायुक्त प्रकाश भादुले यासह विभाग व महामंडळातील अधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे यांनी महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाच्यावतीने सुरू असलेल्या बंदरांचा विकास व आधुनिकीकरणाच्या कामांचा आढावा घेतला. यामध्ये मुंबई शहरातील ससून डॉक, रायगड जिल्ह्यातील कारंजा (उरण), सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आनंदवाडी व रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकरवाडा येथील बंदरांच्या विकासकामांची माहिती घेतली.