
गावातील निवडणुकीसाठी 'या' निष्ठावंत नेत्याने शिवबंधनाची गाठ सोडलीच!
कोपरगाव नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यापासून येथे राजकीय घडामोडींना वेग आला असून, नगराध्यक्षपदाच्या राजकारणात रोज नवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. काका कोयटे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशानंतर आता शिवसेनेपासून उबाठापर्यंत निष्ठावंत राहिलेले माजी नगराध्यक्ष राजेंद्र मुरलीधर झावरे यांनी पक्ष सदस्यत्त्वाचा राजीनामा देत शिवबंधन सोडले आहे. त्यांच्या या निर्णयाने कोपरगावच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
राज्य पतसंस्थेचे अध्यक्ष काका कोयटे यांनी अर्थकारणातून थेट राजकारणाकडे वळत राष्ट्रवादीकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी स्वीकारली. राष्ट्रवादीनेच त्यांना उमेदवारीसाठी आग्रह केला होता. त्याआधीच भाजपाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भाजपाकडून पराग संधान यांची उमेदवारी जाहीर केली होती. काळे–कोल्हे यांच्या मतभेदांमुळे कोयटे यांची उमेदवारी निवडणूक अधिकच रंगतदार बनवेल, असे चित्र होते. मात्र या साऱ्यातच झावरे यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळाली आहे.
Samruddhi Express Accident: समृद्धी महामार्ग की मृत्यूचा सापळा; एका वर्षातील आकडेवारी चिंता वाढवणारी
कोपरगावात शिवसेना प्रथम आणणारे, निष्ठावान नेते म्हणून जिल्ह्यात परिचित असलेले झावरे हे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राहिले. त्यानंतर त्यांना उत्तर नगर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. प्रस्थापितांविरुद्ध संघर्ष करून शिवसेनेचा पाया रोवण्याचे काम त्यांनी केले. रिक्षा संघटनेतील कार्यातून त्यांनी जनसंपर्क वाढवत नगराध्यक्षपदी लोकनियुक्त निवडून येण्याची कामगिरी केली होती. शिवसेनेचे दोन गट पडल्यावरही, अनेक ऑफर असूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठा टिकवून ठेवली होती. त्यामुळे त्यांचा राजीनामा धक्कादायक मानला जात आहे.
उबाठाने नगराध्यक्षपदासाठी भरत मोरे यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत नाराजी वाढली. झावरे यांच्या पाठोपाठ उत्तर जिल्हाप्रमुख कैलास जाधव आणि रिक्षा सेनेचे तब्बल ७०० सभासद यांनीही राजीनामे दिले. मोरे यांच्या पाठीशी मविआचे घटक पक्ष असल्याचे समोर येते. दरम्यान, राजीनामा दिलेले नेते शिंदे गटाच्या शिवसेनेकडे झुकताना दिसत आहेत. जिल्हाप्रमुख नितीन औताडे यांनी झावरे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्याचेही स्पष्ट केले.
राजेंद्र झावरे यांनी थेट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना राजीनामा पाठवून म्हटले, “मी ४५ वर्षांपासून शिवसैनिक आहे. शहरप्रमुख, जिल्हाप्रमुख, लोकनियुक्त नगराध्यक्ष, जिल्हा सहसंपर्कप्रमुख अशी विविध पदे सांभाळण्याची संधी दिलीत. आपल्याबद्दल मनात प्रचंड आदर आहे. परंतु आता आपल्या पक्षात काम करणे शक्य नाही.” झावरे यांच्या या निर्णयामुळे कोपरगावमध्ये निवडणुकीचा संघर्ष अधिकच तीव्र होणार आहे.
Ans: झावरे यांनी उमेदवारी प्रक्रियेत वाढलेली नाराजी, पक्षातील अंतर्गत मतभेद आणि नगराध्यक्ष पदासाठी भरत मोरे यांना दिलेल्या उमेदवारीवर व्यक्त झालेला असंतोष यामुळे शिवबंधन सोडले. ते ४५ वर्षे निष्ठावान शिवसैनिक होते, त्यामुळे त्यांचा निर्णय मोठा धक्का मानला जात आहे.
Ans: त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना (उबाठा) कमजोर होण्याची शक्यता आहे. झावरे यांच्यासह उत्तर जिल्हाप्रमुख कैलास जाधव आणि रिक्षा सेनेचे ७०० सदस्य बाहेर पडल्याने एक मोठा गट शिंदे गटाच्या शिवसेनेकडे झुकतोय, अशी राजकीय चर्चा आहे. त्यामुळे निवडणुकीत नवे समीकरण निर्माण होऊ शकते.