भाजपा कार्यपद्धतीवर आक्षेप घेत संदीप खरात यांनी हाती घेतली तुतारी घेतली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Maharashtra Local Body Elections : अंबड : अंबड नगरपालिका निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नगरपालिका निवडणुकीत जुन्या निष्ठावंत भाजपाच्या कार्यकर्त्यांची नाराजी कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपाचे माजी शहराध्यक्ष व माजी नगरसेवक संदीप साहेबराव खरात यांनी आमदार नारायण कुचे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होत कमळाची साथ सोडून तुतारी हाती घेतल्याने भाजपाच्या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नाराजीची चर्चा शहरात सुरु झाली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीच्या इतिहासात अंबड शहर व परिसराचा मोठा वाटा मानला जातो. महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन प्रांत कार्यवाह मधुकर अण्णा गोसावी यांच्यासारखे अनेक प्रभावी व्यक्तिमत्व अंबड परिसराने राष्ट्रीय स्वयंसेवक संघास दिले. जुन्या निष्ठावंत स्वयंसेवकांची जाज्वल्य परंपरा त्यांच्या घराण्यातील पुढच्या पिढ्यांनी तितक्याच ताकदीने राबवली, त्याच मुशीतून तयार झालेले अनेक निष्ठावंत आज भारतीय जनता पक्षात काम करत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्याासाठी क्लिक करा
निष्ठावंतांचे घरावर तुळशीपत्र ठेवून पक्षाचे काम
ज्यावेळी भाजप कधी सत्तेत येईल असे कोणाला स्वप्नातही वाटत नव्हते त्यावेळी सुद्धा या निष्ठावंत घराण्यांनी धरावर तुळशीपत्र ठेवून पक्षाचे काम अतिशय प्रामाणिकपणे केले, मात्र २०१४ नंतर परिस्थिती बदलली, सत्ता मिळवताना भाजपाने अनेक तडजोडी स्वीकारल्या व अनेकांना इतर पक्षातून भाजपात सामावून घेतले. त्यामुळे तालुक्यातील भाजपाची संस्कृती बदलली, ज्या गोष्टींना व चालीरीतींना आपण आयुष्यभर विरोध केला, त्याच गोष्टी व चालीरीती आपले पक्ष नेतृत्व अंगी स्वीकारताना पाहण्याची वेळ भाजपच्या निष्ठावंतावर आली. ज्या निष्ठावंत घराण्यांनी पक्षाच्या कठीण काळात पक्ष जिवंत ठेवण्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवले, त्याच निष्ठावंतांना पक्ष सत्तेत आल्यानंतर कस्पटासमान बाजूला सारण्यात आले.
२०२५ अंबड नगरपालिका निवडणुकीसाठीचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी सुटल्यानंतर जुन्या निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांनी प्रामाणिक निष्ठेचा विचार करून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करण्याची मागणी केल्यानंतर काही जणांनी त्यांची खिल्ली उडविली.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
तिकीट कापले जाणार !
अनेक जुन्या निष्ठावंत भाजप नगरसेवकांचे व कार्यकर्त्यांचे तिकीट या निवडणुकीत कापले जाणार असल्याची चर्चा शहरात सुरू झाल्याने निष्ठावंतांमध्ये अपमानाची भावना तयार झाली. यातूनच भाजपातील जुन्या निष्ठावंतांमधील खदखद शिगेला पोहोचली आहे. संदीप खरात यांच्या पक्षांतराने या खदखदीला तोंड फुटले असुन शहरातील ओबीसी समाजाचा मोठा चेहरा पक्षात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आणखी निष्ठावंत पक्ष सोडून जाऊ नये यासाठी भाजपचे आमदार नारायण कुचे डॅमेज कंट्रोलसाठी पूर्ण प्रयत्न करत आहेत तर विरोधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री राजेश टोपे भाजपाच्या या जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाराजी घालवण्याचा प्रयत्न करत आहेत. उमेद्वारी अर्ज दाखल करण्यास आणखी दोन दिवस शिल्लक असल्याने आणखी काही मनोरंजक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.






