
फोटो सौजन्य: Gemini
नेवासा तालुक्यातील सोनई परिसरात घरगुती गॅस सिलेंडर वितरणातील अनियमिततेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे जगणे अक्षरशः त्रस्त झाले असून, संबंधित एजन्सींच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “बुकिंग करूनही गॅस मिळत नाही, फोन केला तरी प्रतिसाद नाही, आणि काळाबाजारात मात्र सहज उपलब्ध” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
सोनईमध्ये गॅस टाक्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून काळाबाजार सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नियमित प्रक्रियेनुसार बुकिंग करूनही अनेक दिवस सिलेंडर मिळत नाहीत. मात्र, काही विशिष्ट ठिकाणी हेच सिलेंडर दोन ते तीन पट जादा दराने सहज उपलब्ध होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.
गॅस एजन्सीकडून ग्राहकांना योग्य माहिती दिली जात नाही, फोन कॉल्स उचलले जात नाहीत, तसेच अनेक वेळा उद्धट वागणूक दिली जाते, अशी तक्रार नागरिकानी केली आहे. विशेषतः नेवासा येथील संबंधित गॅस एजन्सीशी संपर्क साधला असता, तेथेही स्पष्ट माहिती मिळत नसल्याने ग्राहक अधिकच संभ्रमात पडत आहेत, गृहिणी आणि ज्येष्ठ नागरिक सर्वाधिक त्रस्त झाले आहेत. गॅस वेळेवर उपलब्ध न झाल्याने गृहिणींचे दैनंदिन स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत झाले आहे.
ज्येष्ठ नागरिकांना पर्याय नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी लाकूडफाटा किंवा इतर पर्याय वापरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे, ही बाब प्रशासनासाठी लाजिरवाणी मानली जात आहे.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, नेवासा येथून “रघुजन गैस सर्विस” नावाच्या मोठ्या चारचाकी वाहनांद्वारे सिलेंडरची वाहतूक थेट सोनईमध्ये, विशेषतः जनपथ हॉटेलच्या पाठीमागील भागात केली जात असल्याचे दिसून येते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गैस उतरवून जादा दराने वितरण होत असल्याची चर्चा जोर धरत आहे. हा प्रकार कोणाच्या आशीर्वादाने चालतो? अधिकृत वितरण यंत्रणेला बगल देऊन ही वाहतूक कशी होते? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्राहकांना अटी-शर्तींचा जाच होत आहे.
सोनईतील गॅस वितरणातील गोंधळ हा केवळ व्यवस्थापनातील त्रुटी नसून, तो सर्वसामान्यांच्या जीवनाशी निगडित गंभीर प्रश्न बनला आहे. गरजेच्या वस्तूंचा काळाबाजार हा केवळ आर्थिक गुन्हा नसून सामाजिक अन्याय आहे. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन ठोस कारवाई केली नाही, तर नागरिकांचा संताप उग्र रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनिल निमसे, मनोज गोसावी. सामाजिक कार्यकर्ते सोनई आता प्रश्न एकच प्रशासन जाग होणार की नागरिकांचा त्रास असाच सुरू राहणार.
इतक्या मोठ्या प्रमाणावर अनियमितता सुरू असताना संबंधित पुरवठा विभाग आणि प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे का? की यामागे काही संगनमत आहे? असा थेट सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. जर अधिकृत दराने गॅस मिळत नसेल आणि काळाबाजार फोफावत असेल, तर ही केवळ एजन्सीची चूक नसून यंत्रणेतल्या त्रुटींचे द्योतक आहे. तात्काळ चौकशीची मागणी स्थानिक नागरिकांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. गॅस वितरणाची साखळी तपासावी जनपथ हॉटेल परिसरातील संशयास्पद हालचालींची चौकशी करावी संबंधित एजन्सींचे लेखापरीक्षण करावे दोषींवर कठोर कारवाई करावी अशी ठोस मागणी होत आहे.