पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करायला नको होतं. त्यावेळी माझ्याकडून थोडी चूक झाली. अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. बारामतीच्या निकालाला मीच जबाबदार आहे. अस अजित पवार म्हणाले. सुनेत्रा यांना उभ करणं कुटुंबाच्या दृष्टीने योग्य नव्हतं. बारामतीतून उमेदवार देण्यासंदर्भात माझ्यावर महायुतीतून कोणताही दबाव नव्हता. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा संसदीय समितीचा होता. असंही अजित पवार म्हणाले.
सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर बिनविरोध निवड
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेत बिनविरोध निवड झाली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये एकाच घरातील सदस्यामध्ये सामना पाहायला मिळाला. यावेळी महायुतीकडून सुनेत्रा पवार तर महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे निवडणुकीत उतरल्या होत्या. यामध्ये सुळेंचा मोठा विजय झाला. बारामतीमधील सुनेत्रा पवारांची उमेदवारी ही माझी चूक होती, असे अजित पवार यांनी म्हटलं. त्याचबरोबर रक्षाबंधनाच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अजित पवार यांची ही कबुली चर्चेचा विषय ठरत आहे. तर यावेळी रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असा प्रश्न अजित पवारांना त्यांच्या कबुलीवेळी मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. त्यावर, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरु आहे. रक्षाबंधनाच्या वेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे अजित पवार यांनी म्हटले होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी सुळे नाशिक दौऱ्यावर
सुळेंना यावेळी अजित पवारांना राखी बांधणार का? असे विचारले असता त्यांनी ‘कळेल’, असे एका शब्दात त्यांनी उत्तर दिले आहे. तसेच मी रक्षाबंधनाच्या दिवशी नाशिक दौऱ्यावर असल्याचे देखील त्यांनी म्हटले. शरद पवार यांना अजित पवार यांनी फोन केल्याचे बोलले जात आहे. यावर विचारले असता शरद पवार यांना अजित पवार यांचा फोन आला की नाही हे मला माहिती नाही. मला तरी फोन त्यांचा आलेला नाही, असे त्यांनी म्हटले.