पुणे : गणेशाेत्सव हा केवळ भक्तीपुरता मर्यादित न ठेवता, सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून ताे लाेकाभिमुख करण्याचे काम गणेश मंडळे करीत असतात, असे काैतुक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
मोफत जेवण कक्षाचे उद्घाटन
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड गणेशोत्सव मंडळामार्फत पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सुरू केलेल्या मोफत जेवण कक्षाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत हाेते. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक गणेश घुले, अनिरुद्ध ऊर्फ बाप्पु भोसले, संतोष नांगरे, नाना आबनावे, मंडळाचे अध्यक्ष सागर भोसले, कार्याध्यक्ष प्रसाद गव्हाणे, राष्ट्रवादी काँग्रेसचेे शहराध्यक्ष दिपक मानकर, गौरव घुले, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, दत्ता सागरे, माजी स्थायी समिती अध्यक्ष बाबुराव चांदेरे आदी उपस्थित होते.
जय शारदा गजानन पुरस्काराचे वितरण
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते देण्यात येणाऱ्या ‘जय शारदा गजानन पुरस्काराचे’ वितरण झाले. विलास भुजबळ ( आदर्श आडतदार ), पंडीत आहेर ( आदर्श व्यापारी ), किसन कानगुडे ( आदर्श हमाल ), राजेश माेहाेळ (आदर्श तोलणार), शंकर साबळे (आदर्श टेम्पाे चालक ), प्रमाेद जाधव ( आदर्श पत्रकार ), राजेंद्र घुले ( उत्कृष्ट कर्मचारी ) यांना हा पुरस्कार दिला गेला. स्मृतिचिन्ह, पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.
शेतकरी हा लाखांचा पोशिंदा
उपमुख्यमंत्री पवार यांनी मंडळाने सुरु केलेल्या माेफत जेवण उपक्रमाचे काैतुक केले. ते म्हणाले, शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. त्यामुळे त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची आवश्यकता आहे. समाजालातील प्रत्येकाला अन्न मिळावे यासाठी तो राबतो. त्यामुळे त्यालाही पोटभर चांगल जेवण मिळालं पाहिजे. हा हेतू चांगला आहे.’’
शेतकऱ्यांना निधी कमी पडू देणार नाही
राज्यातील काही भागात सध्या अवर्षणाची परिस्थिती आहे. गेल्या चार-पाच दिवसात काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो पुरेसा नाही. शेतकऱ्यांसमोर बिकट संकट उभे राहिले असून पिकांचे नुकसान होत आहे. पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी, शेतकऱ्यांपुढील संकटावर मात करण्यासाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
समितीचा नावलाैकिक वाढविण्याचा सल्ला
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडीअडचणी, शेतकऱ्यांच्या काही सूचना असतील तर त्या सोडविण्यात येतील असे नमूद करतानाच उपमुख्यमंत्री पवार यांनी स्वच्छतेबाबत बाजार समिती आणि पुणे महानगरपालिकेने समन्वय ठेवावा. बाजार समिती सर्वच बाबतीत पुढे राहील, तिचा नावलौकीक वाढेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असा सल्लाही त्यांनी संचालकांना दिला.