Photo Credit : Team Navrashtra (शरद पवारांनी डाव टाकला)
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांची साथ सोडत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला.त्यानंतर आता जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतूल बेनके यांनीदेखील जुन्नरमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. तेव्हापासून अतूल बेनके हेदेखील शरद पवारांकडे जाणार का, असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
शरद पवार यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना अतूल बेनके म्हणाले, येत्या दोन अडीच महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका लागणार आहेत. विधानसभा निवडणुकीला समोरे जाताना काहीही घडू शकते. कदाचित अजित पवार आणि शरद पवार साहेब पुन्हा एकत्र येऊ शकतात.
बेनके म्हणाले, विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना काहीही होऊ शकते. त्यावर आताच भाष्य करण्यत काहीही अर्थ नाही. आता आम्ही महायुती म्हणून पुढे जात आहोत, पण जागा वाटपावरून काही झालं तर आम्ही आम्ही, कदचित दादा आणि शरद पवार साहेब पुन्हा एकत्र येऊ शकतात. राज्यातील 288 आमदारांपैकी जुन्नर तालुक्यातील मी एक छोटासा लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे राजकारणात पुढे काय घडेल, हे मी आताच सांगू शकत नाही.
माझी आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात मैत्रीचे नाते आहे. आम्ही मित्रच आहोत आणि मित्रच राहू. त्यामुळे मैत्रीत कुठल्याही प्रकारचा राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. असेही बेनके यांनी स्पष्ट केले. तसेच, खासदार कोल्हे यांनी केलेल्या गाईंचा गोठ्याबाबत आमच्यात चर्चा झाली. त्या व्यतिरिक्त कोणतीही राजकीय चर्चाही झाली नाही, असेही बेनके यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार यांच्या गटाचे आमदार आणि नेतेमंडळी शरद पवार यांच्या गाठीभेटी घेत आहेत. राज्याचे मंत्री छगन भुजबळ, त्यानंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आता अतुल बेनके यांनी पवारांची भेट घेतली. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, राष्ट्रवादीच्या गोटात नेमके चाललेय काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.






