
अकोल्यात प्रारूप यादीत 2 लाख मतदारांची नावे वगळली
अकोला : मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) २०२६ अंतर्गत गणनापत्रांचे वाटप व डिजीटायझेशन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाने प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध केली. जिल्ह्यातील एकूण १५ लाख ९५ हजार ६४४ मतदारांपैकी १३ लाख १८ हजार ६५२ मतदारांचा प्रारूप यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे मागील मतदार यादीच्या तुलनेत २ लाख ७६ हजार ९९२ मतदारांची संख्या घटली आहे.
प्रारूप मतदार यादी जिल्हा प्रशासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाने ३० जूनपासून मतदारयाद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील १ हजार ७४१ बूथ लेव्हल अधिकाऱ्यांमार्फत (बीएलओ) १५ लाख ९५ हजार ६४४ मतदारांची पडताळणी करण्यात आली. जिल्ह्यातील १०० टक्के मतदारांना गणनापत्रांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी ८२.६४ टक्के म्हणजेच १३ लाख १८ हजार ६५२ मतदारांच्या गणनापत्रांचे डिजीटायझेशन पूर्ण झाले.
याआधारे प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या मतदारांचे गणनापत्र प्राप्त झाले नाही, त्यांचा प्रारूप मतदारयादीत समावेश करण्यात आलेला नाही. यामध्ये ४६ हजार २४७ मृत मतदार, ५१ हजार २६ मतदारांचा शोध लागलेला नाही, १ लाख ३४ हजार ५८९ कायमस्वरूपी स्थलांतरित, ४४ हजार ४४८ दुबार मतदार आणि ६८२ अन्य मतदारांचा समावेश आहे.
मृत मतदार वगळता इतर पात्र मतदारांना नमुना क्रमांक ६ भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करता येणार आहे. पडताळणीअंती पात्र ठरणाऱ्या मतदारांचा अंतिम मतदारयादीत समावेश केला जाणार आहे. जिल्ह्यात यापूर्वी १ हजार ७४१ मतदान केंद्रे होती.
1 लाख मतदारांना बजावणार नोटीस
प्रारूप यादीत ज्या मतदारांची नावे मागील मतदारयादीतील नोंदीशी जुळत नाही किंवा जोडणी प्रक्रियेत विसंगती आढळली आहे. अशा जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार ९९२ मतदारांना मतदार नोंदणी अधिकाऱ्यांमार्फत नोटीसा बजावल्या जातील व सुनावणी अंती निर्णय घेण्यात येईल. ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर दरम्यान ही प्रक्रिया पार पडेल.
Mira Bhayandar News : कोट्यवधींच्या वास्तूंची दुरवस्था! मीरा-भाईंदर महापालिकेच्या निष्काळजीपणाचा कळस