अधिकाऱ्यांना आता 'तिसरा डोळा'; वाहन तपासणी होणार पारदर्शक, 10 बॉडीवेअर कॅमेरे मिळाले
अकोला : राज्य शासनाच्या परिवहन विभागाने कामकाजात पारदर्शकता, सुरक्षितता आणि अचूकता वाढविण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, क्षेत्रीय (फिल्ड) अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता ‘बॉडी वेअरेबल कॅमेरे’ उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून रस्ते वाहतूक अंमलबजावणी, वाहन तपासणी, वाहनचालकांशी होणारा संवाद तसेच परिवहन कार्यालयातील विविध तपासण्या आणि चाचण्यांचे कामकाज अधिक पारदर्शक, शिस्तबद्ध आणि विश्वासार्ह होणार आहे.
अकोला आरटीओ कार्यालयास देखील १० बॉडीवेअर कॅमेरे उपलब्ध झाले असून लवकरच त्यांचा वापर सुरू होणार आहे. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अधिकारी रस्त्यावर वाहन तपासणी, नियमभंगावरील दंडात्मक कारवाई, वायुवेग पथकाच्या मोहिमा, वाहन योग्यता प्रमाणपत्र (फिटनेस) तपासणी, वाहनांची प्रत्यक्ष पडताळणी तसेच वाहनचालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) चाचणीदरम्यान होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेचे ध्वनिचित्रमुद्रण होणार आहे. त्यामुळे प्रत्येक कारवाईची वस्तुनिष्ठ नोंद उपलब्ध राहणार असून, कोणत्याही वादग्रस्त प्रकरणात वस्तुस्थिती स्पष्ट करण्यास मदत होईल.
परिवहन विभागाच्या या उपक्रमामुळे अधिकारी आणि नागरिक यांच्यातील संवाद अधिक सभ्य, पारदर्शक आणि जबाबदार होण्यास मदत मिळणार आहे. कारवाईदरम्यान दोन्ही बाजूंच्या सुरक्षेची खात्री मिळण्याबरोबरच गैरसमज, खोट्या तक्रारी किंवा अनावश्यक वाद टाळण्यासही मदत होईल. तसेच कामकाजात उत्तरदायित्व वाढून नागरिकांचा परिवहन विभागावरील विश्वास अधिक दृढ होणार आहे.
सेवेत अधिक पारदर्शकता अन् विश्वासार्हता
परिवहन विभागाच्या मते, हा उपक्रम केवळ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी नसून नागरिकांनाही न्याय्य, पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे. डिजिटल तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विभागाचे कामकाज अधिक गतिमान, कार्यक्षम आणि उत्तरदायी होण्यास मदत मिळणार आहे.
10 बॉडीवेअरेबल कॅमेरे नुकतेच प्राप्त
अकोला आरटीओ कार्यालयास १० बॉडीवेअरेबल कॅमेरे नुकतेच प्राप्त झाले आहेत. त्यांचा वापर ४ मोटार वाहन निरीक्षक व २ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक या फिरते पथक (फ्लाईंग स्क्वॉड) मार्फत केला जाणार आहे. प्रशिक्षण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती प्राप्त झाली.
रेकॉर्डिंगमुळे मिळतील कारवाईचे पुरावे
डिजिटल रेकॉर्डिंगमुळे प्रत्येक कारवाईचे पुरावे सुरक्षित स्वरूपात उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे न्यायालयीन किंवा प्रशासकीय चौकशीमध्ये वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून या ध्वनिचित्रफितींचा उपयोग होऊ शकणार आहे. याशिवाय अधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या गुणवत्तेचे मूल्यमापन, प्रशिक्षण आणि सेवा सुधारण्यासाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे.
परिवहन विभागाचा निर्णय सर्वांच्याच हिताचा
परिवहन विभागाचा हा निर्णय वाहनचालक, वाहनमालक आणि अधिकारी या सर्वांच्याच हिताचा आहे. बॉडी वेअरेबल कॅमेऱ्यांमुळे कामकाजात पारदर्शकता खात्री मिळेल. वाहनचालकांनी वाहन चालविताना सर्व वैध कागदपत्रे जवळ बाळगावीत, वाहतूक नियमांचे पालन करावे आणि रस्ता सुरक्षेसाठी सहकार्य करावे.
– रवींद्र भुयार, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अकोला.






