रायगड : रायगड जिल्ह्यातील अलिबाग मुरुड मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार महेंद्र दळवी यांना मोठ्या मताने विजय मिळवून देण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने जोरदार तयारी सुरू केली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून केलेली कोट्यवधींची विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचविणे, आगामी निवडणुका जिंकण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हात मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात पोहचून काम करावे असे आवाहन शिवसेनेच्या आढावा बैठकीत करण्यात आले.
वरिष्ठांच्या जोशपूर्ण मार्गदर्शनाने पदाधिकारी कार्यकर्त्यांत उत्साह संचारल्याचे चित्र पाहायला मिळाले. आमदार महेंद्र दळवी यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई तसेच वरिष्ठ निरीक्षक, माजी आमदार सदानंद चव्हाण, शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये यश संपादन करण्याच्या दृष्टीने रणनीती आखण्यात आली. या बैठकीत शिवसेना पक्ष संघटना अधिक मजबूत व बलाढ्य करणे, तसेच आत्तापर्यंत झालेल्या विकास कामांचा आढावा व जिल्हा नियोजन समिती अंतर्गत कामांचे नियोजन करणे बाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यात आली.
हॉरीझॉन हॉल खडताळ पूल बुरुमखाण अलिबाग येथे पार पडलेल्या बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांना वरिष्ठांनी पक्षहीताचे मार्गदर्शन केले. यावेळी अलिबाग, मुरुड, रोहा मतदार संघातील युवा जिल्हाप्रमुख, महिला जिल्हाप्रमुख, युवती सेना जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, सर्व सेलचे तालुका प्रमुख, उपतालुका प्रमुख, तालुका संघटक, उपसंघटक, सर्व विभाग प्रमुख, विभाग संघटक, विभाग संपर्क प्रमुख, सर्व महिला, उप विभाग प्रमुख, युवक, युवती संरपच ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.