
दबावतंत्रामुळे मंचरचे राजकारण तापले, बंडखोर अन् अपक्ष उमेदवारांच्या हालचालींवर नेत्यांचे लक्ष
काही उमेदवार किंवा त्यांच्या समर्थकांकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर “तू माघार घे, नाहीतर तुला पाहून घेऊ” अशा दबावयुक्त धमक्या दिल्याची चर्चा जोरात आहे. या दमबाजीमुळे स्थानिक पातळीवर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, मतदारही या घडामोडींकडे चिंतेने पाहत आहेत. माघारीसाठी केलेल्या राजकीय दबावामुळे गावागावात कुजबुज वाढली आहे.
बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष
पक्षांतील नेतेही बंडखोर आणि अपक्ष उमेदवारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत. काही प्रभागांत गट–तटांच्या भांडणांनी तापलेली परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत असल्याने नेत्यांची धावपळ वाढली आहे. कोण माघार घेणार आणि कोण शेवटपर्यंत उभा राहणार, यावर अनेक प्रभागांचे राजकीय गणित अवलंबून आहे. एकूणच, उमेदवारी माघारीच्या अंतिम दिवसाच्या आगमनाने मंचरची निवडणूक तापली असून, दमबाजी आणि तणावाने मतदानापूर्वीच वातावरण तापून गेले आहे.
नेत्यांची धावपळ सुरू
मंचर नगरपंचायतीच्या निवडणुकीत राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे. अनेक इच्छुकांनी अपक्ष म्हणून किंवा प्रतिस्पर्धी पक्षात जाऊन उमेदवारी अर्ज भरत पक्षश्रेष्ठींनाच मोठा धक्का दिला आहे. अनपेक्षितरीत्या वाढलेल्या बंडखोरीमुळे पक्षांच्या रणनीतीत गोंधळ निर्माण झाला असून, या नाराज कार्यकर्त्यांना पुन्हा गाठीशी बांधण्यासाठी नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. बंडखोर उमेदवारांना पटवण्याचे प्रयत्न वाढल्याने त्यांचाही भाव चढू लागला आहे. काही जणांना पक्षांतर्गत मोठ्या आश्वासनांची रीघ लागली असून, बंडखोरांना आपलेसे करण्यासाठी नेते व्यक्तिगत भेटी, चर्चा, मध्यस्थी अशा विविध उपाययोजना करत आहेत. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस शुक्रवारी (दि.२१) रोजी असल्याने सर्वच पक्षांना निवडणूक समीकरणे सांभाळणे आणि बंडखोरांना परत आणणे ही मोठी कसरत बनली आहे. राजकीय हालचालींनी संपूर्ण तालुक्याचे लक्ष मंचरकडे लागले असून, प्रभागनिहाय पेच अधिक गुंतागुंतीचे होत आहेत. बंडखोर शांत होणार की आपल्याच उमेदवारीवर ठाम राहणार, यावर निवडणूक राजकारणाचा पुढील प्रवास अवलंबून राहणार आहे.