
सोलापुर जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष आमनेसामने; भाजपला टक्कर देण्यासाठी मित्रपक्ष सज्ज
राज्य आणि केंद्रात सत्तेत असणारे पक्ष एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. अक्कलकोट तालुक्यात माजी राज्यमंत्री सिध्दाराम म्हेत्रे शिवसेना शिंदे गट आणि भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी समोरासमोर आले आहेत. बार्शी नगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठा ट्रिस्ट निर्माण झाला आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढवेल असे वाटत असलेल्या भाजपाने शिंदेसेनेला सोबत घेत महायुती म्हणून एकत्र लढण्याची घोषणा केली, तर दुसरीकडे स्थानिक आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेल्या सोपल, बारबोले गटाने शेवटच्या टप्प्यात महाविकास आघाडी म्हणून नव्हे तर उद्धवसेनेच्या वतीने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला, तर राष्ट्रवादी अजित पवार गटानेही सोपल गटाला पाठिंबा जाहीर केल्याने ते महायुतीसोबत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बारबोले यांच्या या निर्णयामुळे बार्शी नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अस्तित्व जवळपास संपल्यातच जमा झाले आहे, तर काँग्रेसनेही स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचेही अस्तित्व नसणार आहे .
कुर्डवाडी नगरपरिषदेवर एक अपवाद वगळता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांची एकहाती सत्ता आहे. यंदाच्या निवडणुकीत ते स्वतंत्रपणे लढत आहेत. अजित पवार गटाचे माजी आमदार संजय शिंदे व रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब जगताप यांच्या संयुक्त आघाडीने थेट आव्हान निर्माण केले आहे, तर शिंदेसेनेचे संजय कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील तालुकाप्रमुख आनंद टोणपे व शहराध्यक्ष संभाजी सातव यांच्या गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष दत्ताजी गवळी व रासपचे सोमा देवकते गटाशी युती करून संपूर्ण जागा लढविण्याचा निर्धार केला आहे, तर भाजपच्या वतीने मंडल अध्यक्ष अविनाश गोरे यांनी, तर काँग्रेसच्या वतीने शहराध्यक्ष फिरोज खान, अल्पसंख्याक शहराध्यक्ष हमीद शिकलकर यांच्या नेतृत्वाखाली पॅनेल उभे करून आपले नशीब आजमावत आहेत.
पंढरपूरमध्ये भाजपाविराेधात सर्वपक्षीयांची आघाडी
पंढरपूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सर्वपक्षीय आघाडीच्या उमेदवार डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांच्या विरोधात अखेर भाजपाने शामल लक्ष्मण शिरसट यांना उमेदवारी दिली आहे. नव्याने उदयास आलेल्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीनेही नगराध्यक्ष पदासाठी सारिका राहूल साबळे यांचा अर्ज दाखल केल्याने या लढतीत रंगत वाढणार हे स्पष्ट झाले आहे. सलग साडेसात वर्षे नगराध्यक्षपद भूषवत विक्रम केलेल्या साधना नागेश भोसले पुन्हा एकदा लढण्यास इच्छुक होत्या. मात्र, मतविभागणी टाळण्यासाठी त्यांनी उमेदवारी दाखल केली नाही. त्यांच्याऐवजी आता माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले प्रभाग क्र. १३ ब मधून नगरसेवक पदासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरले असून, तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून ते निवडणूक लढविणार आहेत.
माेहाेळमध्ये राजन पाटलांची सून मैदानात
मोहोळ तालुका सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरत आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीत थेट आरोपांच्या फैरी उडत आहे. भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट अशी कडवी झुंज निर्माण झाली आहे. अनगर नगरपंचायातीत १७ नगरसेवक माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवडून आले आहेत. नगराध्यक्षपदासाठी राजन पाटील यांच्या सुनेने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या विराेधात उज्वला थिटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे बिनविराेध केल्याने उत्कंठा वाढली आहे.
अकलूजमध्ये भाजपा विरुद्ध शरद पवार गट
अकलूज नगरपरिषदेसाठी चुरशीच लढत होत आहे. भाजपा विरुध्द राष्ट्रवादी शरद पवार गट यांच्यात कडवी झुंज आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहीते पाटील यांनी या निवडणूकीत विशेष लक्ष घातले आहे. माजी आमदार राम सातपुते यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. आरोप प्रत्यारोपांचा धुरळा सध्या माळशिरस तालुक्यातून उडत आहे.