
९३ हजार शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत! शासनाच्या विलंबावर नाराजी; नियमित कर्जफेड करूनही पदरी निराशाच
Amravati News: नियमितपणे पीककर्जाची प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र ठरलेल्या अमरावती जिल्ह्यातील तब्बल ९३ हजार १४९ शेतकऱ्यांना अद्याप ५० हजार रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा आहे. दिवाळीपूर्वी अनुदानाची रक्कम खात्यात जमा होईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, दिवाळी संपूनही शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने पात्र शेतकऱ्यांची निराशा वाढली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १ लाख २२ हजार शेतकरी खातेदारांना दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. याच योजनेत नियमितपणे पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली होती.(फोटो सौजन्य – AI)
मात्र, या घोषनेला अद्याप प्रत्यक्ष लाभाचे स्वरूप मिळाले नाही. परिणामी, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांच्या तुलनेत नियमित कर्जफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ९३ हजार १४९ पात्र शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ देण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या निधीची तरतूद अद्याप झालेली नसल्याने अनुदान वितरण रखडल्याची माहिती आहे. शासनाने घोषणा केली, पात्र शेतकऱ्यांची संख्याही निश्चित झाली; परंतु प्रत्यक्ष अनुदान खात्यात जमा होण्याची प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात पावसाची कमतरता, शेती उत्पादनातील घट आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. बियाणे, खते, औषधे आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणारे ५० हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिलासा देणारे ठरू शकते. या रकमेतून पुढील हंगामाच्या शेतीसाठी आर्थिक हातभार लागण्याची अपेक्षा आहे.
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यामागील शासनाचा उद्देश प्रत्यक्षात साध्य व्हायचा असेल, तर अनुदान वितरणाला गती देणे गरजेचे आहे. त्यामुळे निधीची तरतूद करून ९३ हजार १४९ पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहन अनुदान लवकरात लवकर वितरित करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.