
दुष्काळात वाचविलेले सोयाबीन मजूरटंचाईने अडले! काढणी लांबल्यामुळे नुकसान होण्याची शक्यता
Amravati News: यंदा पावसाने ओढ दिल्याने अनेक भागांत कोरड्या दुष्काळाची झळ सोसत शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पीक उभे केले. पाण्याची कमतरता, वाढता लागवड खर्च आणि प्रतिकूल परिस्थितीत पीक वाचविण्यासाठी केलेली धडपड यानंतर आता काढणीच्या ऐन हंगामात मजूरटंचाईचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. मजूर मिळत नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे. अल्पदरात हार्वेस्टर उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. सोयाबीनच्या उत्पादनावर दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा आधीच परिणाम होण्याची शक्यता आहे.(फोटो सौजन्य – AI)
Vidhan Parishad: काँग्रेसचे ३ उमेदवार जाहीर! काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश अन् पोहरे यांना लागली लॉटरी
उपलब्ध पाण्यात पीक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त खर्च करावा लागला. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न कमी असताना काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अनेक शेतांमध्ये सोयाबीन काढणीसाठी तयार झाले आहे. मात्र मजुरांची उपलब्धता कमी असल्याने काढणी वेळेत होत नाही. काढणीला विलंब झाल्यास शेंगा फुटून दाणे जमिनीवर सांडण्याची शक्यता असून, त्यातून उभ्या पिकाचे प्रत्यक्ष नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे. आधीच दुष्काळामुळे उत्पादन घटण्याची शक्यता असताना काढणीच्या विलंबामुळे होणारे नुकसान शेतकऱ्यांसाठी अधिकच गंभीर ठरणार आहे.
वर्षभर कष्ट करून उभे केलेले पीक हातातोंडाशी आले असताना ते केवळ मजूर टंचाईमुळे शेतातच राहून वाया जाऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करण्याची गरज आहे. कृषी विभागाने गावनिहाय परिस्थितीचा आढावा घेऊन काढणीसाठी आवश्यक यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. दुष्काळाने उत्पादन घटले तरी चालेल. मात्र तयार झालेले पीक काढणी अभावी वाया जाऊ नये, एवढीच बळीराजाची अपेक्षा आहे.
एकीकडे पावसाअभावी उत्पादनावर परिणाम झाला आहे. दुसरीकडे वाढलेला शेतीचा खर्च आणि आता काढणीसाठी मजूर मिळत नसल्याने शेतकरी तिहेरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. तयार पीक वेळेत शेतातून बाहेर निघाले नाही, तर शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले जाण्याची भीती आहे.
मजूरटंचाईची तीव्रता लक्षात घेता शासन व कृषी विभागाने तातडीने हार्वेस्टर व अन्य काढणी यंत्रणा उपलब्ध करून द्यावी. उपलब्ध यंत्रे शेतकऱ्यांना अल्पदरात मिळावीत, तसेच गावनिहाय काढणी यंत्रांचे नियोजन करून तयार सोयाबीन वेळेत शेतातून बाहेर काढण्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.