विधान परिषदेसाठी तीन उमेदवारांची नावं जाहीर
मोठी बाब म्हणजे काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर २४ तासातच प्राध्यापक अदिती पोहरे यांना विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघामधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी प्रा. अदिती पोहरे यांना विधान परिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मान्यतेनंतरच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी शुक्रवारी उमेदवारांची ही अधिकृत घोषणा केली आहे. यामुळे आता काँग्रेसच्या तीन जागांची भूमिका स्पष्ट झाली असल्याचे चित्र आहे.
अभिजित वंजारी हे सध्याचे नागपूर पदवीधर मतदारसंघाचे काँग्रेसचे विधान परिषद सदस्य आहेत. जयंत आसगावकर हे पुणे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान सदस्य आहेत. तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून मिळालेल्या अदिती पोहरे यांच्या उमेदवारीमुळे आता त्यांच्या राजकीय प्रवेश निश्चित मानला जात आहे. महत्त्वाचं म्हणजे मुंबईमधील टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत गुरूवारी प्रा. अदिती पोहरे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि २४ तासातच त्यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आता अधिक चर्चा रंगली आहे. दरम्यान यशोमती ठाकूर यांना त्यावेळीच पोहरे यांना उमेदवारी मिळू शकते याचे संकेत दिले होते आणि आता काँग्रेसच्या नेतृत्वाकडून त्याची अधिकृत घोषणादेखील कऱण्यात आली आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २३ ऑक्टोबर, २०२६ रोजी मतदान होणार असून २७ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. यामध्ये तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ६ ऑक्टोबर आहे आणि ७ ऑक्टोबर रोजी अर्जांची छाननी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान अर्ज मागे घ्यायचा असल्यास अंतिम मुदत ही ९ ऑक्टोबर राहणार आहे.
काँग्रेसमध्ये पुन्हा इनकमिंग; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत बड्या नेत्यांचा प्रवेश






