
राजकीय घडामोडींना वेग, कोल्हापुरात भाजपचाच महापौर? शिंदे सेनेच्या हालचालींवर काँग्रेसचे लक्ष
शिवसेनेला पहीला महापौर करण्याचा शब्द काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी यापूर्वीच दिला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या हालचालीवर काँग्रेस लक्ष ठेवून आहे. या पार्श्वभूमीवर महापौर कोणत्या पक्षाचा होणार, किती कालावधीसाठी होणार, कोणत्या पक्षातील कोणाचे पारडे जड आहे? याची चर्चा महापालिकेच्या वर्तुळात आता सुरू झाली आहे.
संभाव्य महापौर उमेदवार
ओबीसी पुरुष व महिला
विशाल शिराळे, रिंकू देसाई , विजय खाडे , प्रमोद देसाई , वैभव कुंभार व सुरेखा ओवटकर व रुपाराणी निकम ( सर्व भाजप) तर शिंदे सेनेकडे अश्किन अजरेकर व अजय इंगवले (शिवसेना) यांचे नाव आहे.
रुपाराणी निकम यांचे नाव आघाडीवर
भाजपा महिला जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेल्या रूपाराणी निकम या महाडिक गटाच्या कट्टर समर्थक आहेत. त्या दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांनी माजी महापौर भूपाल शेटे यांचा पराभव केला आहे. एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांना पहिल्यांदा संधी मिळू शकते अशी शक्यता आहे.
महापौरपदाची मागील २० वर्षांतील स्थिती तीनवेळा सर्वसाधारण, तीनवेळा सर्वसाधारण महिला, एकवेळा एससी महिला, एकवेळा ओबीसी महिला असे आरक्षण जाहीर झाले होते.
महापालिकेसाठी पहिल्यांदा महापौरपदाचा आग्रह शिंदेसेनेने घेतला होता. आमदार व राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षिरसागर यांनी तशी माहीती माध्यमांना दिली होती. त्यामुळे सेनेची इच्छा लपून राहिलेले नाही.
हे सुद्धा वाचा : पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस–वंचितची अधिकृत आघाडी; भाजपविरोधात एकत्र लढणार
…म्हणूनच भाजपा मोठा भाऊ
कोल्हापूर महानगरपालिकेत मोठा भाऊ भाजपचा महापौर होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानण्यात येत आहे. महायुतीत भाजपने २६ जागा जिंकून मोठा भाऊ असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे महायुतीचा पहिला महापौर भाजपचा होईल, हे भाजपा गोटातून स्पष्ट झाले आहे. महापौरपद भाजपकडे गेले तर स्थायी समिती सभापतिपदावर शिंदेसेना आपला हक्क सांगणार आहे.
नवीन पदाधिकारी निवडीत उपमहापौर, स्थायी समिती सभापती याबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत. महापालिकेचे नेतृत्व करणारे ज्येष्ठ नेते, मंत्री हसन मुश्रीफ यांनी मागच्या तीन पंचवार्षिक निवडणुकीत महापालिकेत नेतृत्व केले आहे. पद वाटपाचे फॉर्म्युले त्यांना माहीत आहेत. त्यामुळे ते सांगतील तो फॉर्म्युले ठरविले जाण्याची शक्यता आहे. यंदा मुश्रीफ यांच्या जोडीला प्रथमच कॉग्रेसचे सतेज पाटील असणार नाहीत.
महायुती मधील जागावाटपाच्या फॉर्मुल्यानुसार महापौरपद भाजपाला मिळाल्यास शिवसेनेकडे उपमहापौर व परिवहन समिती सभापती पद मिळू शकते. मागील काही वर्षाचा इतिहास पाहिला तर यंदा पहिल्यांदाच महायुतीची संपूर्ण सत्ता स्थापन होत असल्याने महापौरसह सर्व पदाधिकारी युतीचे होणार आहेत.