(Photo - X)
Maharashtra Drought : राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील दोन तालुके ट्रिगर-१च्या यादीतून वगळल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. नांदेड जिल्ह्यातील १६ पैकी १४ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ लागू करण्यात आला असून मुखेड आणि मुदखेड या दोन तालुक्यांचा त्यात समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर खासदार अशोक चव्हाण यांनी मराठवाड्यातील कोणत्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचं म्हटलं आहे.
दुष्काळ जाहीर करण्याच्या प्रक्रियेत ट्रिगर-१ हा सुरुवातीचा टप्पा आहे. पावसाची तूट आणि पावसातील प्रदीर्घ खंड यांसारख्या निकषांच्या आधारे ट्रिगर-१ लागू केला जातो. त्यानंतर जमिनीतील ओलावा, पिकांची परिस्थिती आणि इतर परिणामकारक घटकांचा विचार ट्रिगर-२मध्ये केला जातो.
याच मुद्द्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले की, “कोणतेही तालुके मुद्दाम वगळण्यात आलेले नाहीत. ट्रिगर-१च्या निकषात मराठवाड्यातील दोन तालुके बसले नाहीत. मात्र ऑक्टोबरमध्ये ट्रिगर-२च्या माध्यमातून जमिनीतील ओलावा आणि पिकांची परिस्थिती तपासली जाईल. ट्रिगर-१मध्ये राहिलेले तालुके ट्रिगर-२मध्ये निश्चितपणे घेतले जातील,” असा दावा त्यांनी केला.
Maharashtra Drought : दुष्काळावर विशेष अधिवेशन बोलवा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
दरम्यान, दोन तालुके वगळल्यावर काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या टीकेवरही चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली. “दुष्काळ हा पक्ष पाहून ठरवला जात नसल्याचं त्यांनी म्हटलं. आमदार श्रीजया चव्हाण यांचा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क झाला असून, आपलंही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
“मराठवाड्यातल्या कुठल्याही तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही, हा माझा शब्द आहे,” असं अशोक चव्हाण म्हणाले. दुष्काळग्रस्त भागातील पाहणी दौऱ्याबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. एखाद्या भागात पीक हिरवं दिसत असलं तरी त्यातून प्रत्यक्ष उत्पन्न किती मिळणार, हे महत्त्वाचं असल्याचं त्यांनी सांगितलं. पाऊस योग्य वेळी न पडल्यास पिकांच्या उत्पादनावर परिणाम होतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पाहणी केली जात असल्याचं चव्हाणांनी स्पष्ट केलं.
“शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मदत कधी मिळणार, यावर सध्या असेसमेंट सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची उपसमिती असून, सर्व जिल्हाधिकाऱ्यांचे अहवाल आल्यानंतर दुष्काळाची व्याप्ती आणि आवश्यक निधी निश्चित केला जाईल, असं चव्हाण म्हणाले.
राज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केल्याचाही त्यांनी उल्लेख केला. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत मिळेल का, याबाबत मात्र अशोक चव्हाण यांनी ठोस कालमर्यादा सांगितली नाही. सध्याचा काळ अडचणीचा असून शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत आहेत,” असं त्यांनी म्हटलं.
Maharashtra Drought : ’99 टक्के भागात दुष्काळाची स्थिती’; नाना पटोलेंचा सरकारवर जोरदार हल्लाबोल






