आशिया खंडातील पहिल्या लोको पायलटची अभिमानास्पद सेवानिवृत्ती; तब्बल 36 वर्षे दिली सेवा
सातारा : रेल्वे स्टेशनवर राजधानी एक्सप्रेस सायंकाळी साडेपाच वाजता येऊन थांबते आणि मोटरमनच्या केबिनमधून आशिया खंडातील पहिल्या लोको पायलट सुरेखा यादव अभिवादन करत बाहेर पडतात. तब्बल 36 वर्षांच्या रेल्वेतील सेवेचा त्यांचा तो अखेरचा दिवस असतो. रेल्वेचे त्यांचे सहकारी आणि हितचिंतक त्यांच्या स्वागतासाठी तेथे जय्यत तयार असतात. प्रामाणिकपणे सेवा केल्याचे आनंदाश्रू सुरेखा ताईंच्या डोळ्यांमध्ये दाटतात आणि मोटरमनच्या केबिनला नमस्कार करून सेवानिवृत्तीचा क्षण त्या अनोख्या पद्धतीने साजरा करतात. हा मनाला स्पर्शून जाणारा क्षण तेथील सर्व रेल्वेच्या प्रवाशांनी नुकताच अनुभवला.
साताऱ्याच्या सुरेखा यादव या आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून 36 वर्षाच्या सेवेनंतर 18 सप्टेंबर रोजी निवृत्त झाल्या. त्यांनी रेल्वे चालक बनत रुढीवादी कल्पना मोडल्या आणि महिलांसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणा ठरल्या. बुधवारी त्यांनी अखेरची राजधानी ट्रेन चालवत आपल्या कारकिर्दीची अभिमानास्पदाखेल केली. मध्य रेल्वेने त्यांच्या निवृत्तीनिमित्त काही खास फोटो त्यांचे सोशल मीडियावर प्रसारित केले. सातारा शहरालगतच्या मूळच्या करंजे गावठाणातील सुरेखा भोसले या लग्नानंतर सुरेखा यादव बनल्या.
सातारा जिल्ह्यात 2 सप्टेंबर 1965 रोजी सोनाबाई रामचंद्र भोसले यांच्या पोटी सुरेखा यादव यांचा जन्म झाला. वडील रामचंद्र भोसले हे शेतकरी. पाच भावंडांमध्ये सुरेखा अभ्यासात तितक्याच हुशार होत्या. प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील सेंट पॉल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये पूर्ण केल्यावर व्यावसायिक शिक्षणासाठी त्यांनी कराड गाठले. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण करत 1986 साल त्यांच्यासाठी कलाटणी देणारे ठरले. लोको पायलट होण्यासाठी त्यांनी फॉर्म भरला त्याचवर्षी लेखी परीक्षा पार पडली. ज्यावेळी परीक्षा देण्यासाठी त्या परीक्षा केंद्रावर गेल्या. त्यावेळी पुरुषांमध्ये त्या एकमेव महिला होत्या.
सहाय्यक चालक म्हणून नियुक्ती
कल्याण येथील ट्रेनिंग स्कूलमध्ये सहाय्यक चालक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आणि 1989 साली सहाय्यक चालकपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. याच दिवसापासून महिला सक्षमीकरणाचा एक नवीन अध्याय सुरू झाला. पहिल्यांदा वाडी बंदर ते कल्याण या मार्गावर धावणाऱ्या एल 50 या क्रमांकाच्या मालगाडीचे त्यांनी सारथ्य केले.
डेक्कन क्वीन सुद्धा चालवली
लोको पायलट म्हणून त्यांनी पश्चिम घाटात मुंबई-पुणे मार्गावर डेक्कन क्वीन सुद्धा चालवली. 2011 साली आशिया खंडातील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून त्यांचा सत्कार झाला. 2000 सालामध्ये ममता बॅनर्जी यांनी महिलांसाठी विशेष ट्रेन सुरू केली होती. त्याची जबाबदारी सुद्धा त्यांच्यावरच सोपवण्यात आली होती. सुरेखा यादव यांनी खऱ्या अर्थाने लोको पायलट क्षेत्रात क्रांती घडवली.
सध्या 1700 महिला कार्यरत
यादव यांचा आदर्श ठेवून सुमारे 1700 महिला आत्तापर्यंत लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट अशा पदांवर सध्या कार्यरत आहेत. 2001 सालामध्ये वुमन्स अवॉर्ड तसेच भारतीय रेल्वेतील पहिल्या महिला लोको पायलट म्हणून आरडब्ल्यूसीसी सर्वोत्कृष्ट महिला पुरस्काराने त्या सन्मानित झाल्या.
हेदेखील वाचा : Devendra Fadnavis: “ही सर्व धोरणे राज्याच्या विकास आणि…”; नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस?