भिवंडी : भिवंडी शहरातील अनेक मतदान बूथवर कमालीचा घोळ केलेला पाहायला मिळत आहे. मतदान करण्यासाठी जे दोन बॅलेट मशिन्स ठेवण्यात येतात त्या उलट्या अनुक्रमाने लावण्यात आल्याचे अनेक मतदारांच्या निदर्शनास आले आहे. म्हणजे अनुक्रमांक १ ते १६ साठीची मशिन अगोदर आणि अनुक्रमांक १७ ते २७ साठी असलेली मशिननंतर लावणे अपेक्षित आहे. परंतु भिवंडीमधील अनेक बूथवर या मशिन्स नेमक्या उलट्या क्रमाने लावल्याची तक्रार अनेक मतदात्यांनी केली आहे. बॅलट मशिन उलट्या अनुक्रमाने लावल्यामुळे मतदारांचा गोंधळ उडाल्याचे दिसून येत आहे.
हा प्रकार नक्की काय आहे आणि कोणाच्या सांगण्यावरून केला जातोय हे सांगणे कठीण आहे. पण निवडणूक आयोग यासंदर्भात काही कठोर कारवाई करणार का हे पहावे लागेल. तसेच जिजाऊ संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांचे असेही म्हणणे आहे की मतदान करतांना लोकांचा गोधळ व्हावा आणि निलेश सांबरे यांचा मतदानाचा टक्का कमी व्हावा म्हणून सांबरे यांचं ज्या प्रभागात प्राबल्य आहे तिथे जाणीवपूर्वक हा घोळ घातला गेला आहे. त्यामुळे सांबरे यांचा जर पराभव झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी निवडणूक आयोगाची असेल असेही जिजाऊ संघटनेच्या पदाधिकारी यांचे म्हणणे आहे.
[read_also content=”बारावीचा निकाल उद्या जाहीर होणार; ‘इथं’ पाहता येणार निकाल https://www.navarashtra.com/maharashtra/12th-result-will-be-announced-tomorrow-results-can-be-seen-here-nrdm-535564/”]
अशा अनैतिक आणि असंविधानिक कृत्यामुळे निवडणूक आयोगाच्या योग्यतेवर जनता प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. तसेच अशाप्रकारच्या दुष्कृत्यांमुळे लोकशाहीचं पावित्र्य धोक्यात येण्याची भिती अनेक जाणकारांनी व्यक्त केली आहे.