5 महिन्यांपूर्वी जे घडले, तेच पुन्हा घडणार? पवार vs पवार मध्ये कोण जिंकणार? (फोटो सौजन्य-X)
एकीकडे महायुतीने आपला जाहीरनामा प्रसिद्ध करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी 10 हमीभाव जाहीर केले आहेत. तर दुसरीकडे महायुतीचा भाग असलेला अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसही आज (6 नोव्हेंबर) निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करणार आहे. याचदरम्यान शरद पवारांनी बारामतीत, अजित पवारांच्या विरोधात उघ़डपण नेतृत्वावरुन आव्हान उभं केलं आहे. अजित दादांनी 25-30 वर्ष नेतृत्व केलं. आता नवं नेतृत्व म्हणून युगेंद्र पवारांना संधी द्या, असं आवाहन पवारांनी बारामतीकरांना दिलं. दरम्यान बारामती विधानसभेच्या जागेवर अजित पवार यांच्यात चुरशीची लढत असून त्यांचे पुतणे युगेंद्र पवार त्यांना आव्हान देणार आहेत. म्हणजेच तब्बल 5 महिन्यांनंतर बारामतीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत पाहायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीच्या जागेवर अजित पवारांच्या विरोधात आघाडी घेतली असून, नातू युगेंद्र यांच्या समर्थनार्थ मंगळवारी एकामागून एक निवडणूक रॅलींना संबोधित केले. बारामतीच्या जागेवर युगेंद्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि त्यांचे काका अजित पवार यांच्या विरोधात लढत आहेत.
हे सुद्धा वाचा: भोर मतदारसंघात तिरंगी नव्हे तर थेट चौरंगी लढत होणार; नक्की कोण होणार आमदार? जनतेला उत्सुकता
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथे एका मेळाव्याला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, या वर्षाच्या सुरुवातीला बारामती लोकसभा मतदारसंघाची लढत पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये होती. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्यातील लढतीचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले की, आता पाच महिन्यांनंतर तेथील जनतेला तीच परिस्थिती दिसेल.
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सामना पवार विरुद्ध पवार असा झाला. शरद पवार यांनी अनेक निवडणूक सभा घेऊन त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांच्यासाठी मतदारांकडून पाठिंबा मागितला होता. निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी मेहुणी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला होता.
हे सुद्धा वाचा: राज्यात 6 लाखाहून जास्त दिव्यांग मतदार
बारामती विधासभामधील लढत जिल्हा किंवा राज्यासाठी नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या राष्ट्रीय प्रमुखांचे लक्ष असणारी निवडणूक ठरेल, अशी चर्चा प्रत्यक्ष प्रचार किंवा निवडणुकीपूर्वीच सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार इथे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आहेत. तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून त्यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार लढत देत आहेत. त्यामुळेच या मतदारसंघावर सर्वच राजकीय पक्षांचे बारकाईने लक्ष राहणार आहे. ही खरी लढत अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच असल्याचं देखील म्हटलं जात आहे. जाहीर सभा, प्रचारफेऱ्या, वैयक्तिक गाठीभेटी यांचा धुरळाच या मतदारसंघात प्रचाराच्या १४ दिवसांत उडेल, असे बोलले जात आहे.