
फोटो सौजन्य - Social Media
दादासाहेब लवटे । नवराष्ट्र, मंगळवेढा : मोहोळ तालुक्यातील मत्स्यव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या बेगमपूर गावाने शुक्रवारी एक ऐतिहासिक आणि रोमांचकारी क्षण अनुभवला. भीमा नदीत मासेमारीसाठी गेलेल्या मच्छीमार सिद्धू भोई यांच्या जाळ्यात तब्बल २५ किलो वजनाचा भलामोठा कटला मासा अडकल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. बेगमपूरच्या मच्छी मार्केटच्या इतिहासात प्रथमच एवढा मोठा कटला मासा सापडल्याने नागरिकांनी तो पाहण्यासाठी मोठी गर्दी केली.
शुक्रवारी सकाळी सिद्धू भोई व त्यांच्या सहकाऱ्यांनी भीमा नदीच्या पात्रात जाळे टाकले होते. दुष्काळी परिस्थितीमुळे नदीतील पाण्याची पातळी कमी असतानाही त्यांच्या जाळ्यात हा महाकाय मासा अडकला. जाळे ओढताना वजनामुळे मोठी कसरत करावी लागली. अखेर सर्व मच्छीमारांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा ‘जलसम्राट’ सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणण्यात यश आले. माशाचे वजन केल्यानंतर तो तब्बल २५ किलोचा कटला असल्याचे स्पष्ट झाले. एवढा मोठा मासा पाहून उपस्थित नागरिक आश्चर्यचकित झाले. त्यानंतर हा मासा बेगमपूर मच्छी मार्केटमध्ये आणण्यात आला. तेथे नागरिकांनी मोठ्या उत्साहात गर्दी करत छायाचित्रे आणि व्हिडिओ काढून या दुर्मीळ क्षणाची नोंद केली.
बेगमपूर हे गाव मत्स्यव्यवसायाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाते. मात्र, स्थानिक ज्येष्ठ मच्छीमारांच्या मते, यापूर्वी कधीही एवढ्या आकाराचा कटला मासा सापडला नव्हता. त्यामुळे या घटनेची नोंद बेगमपूरच्या मत्स्यव्यवसायाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण घटना म्हणून केली जात आहे. या मासेमारी मोहिमेत शंकर भोई, सुनील भोई, दशरथ भोई, महादेव भोई, सुभाष भोई, आकाश भोई, दत्ता भोई, रोहित भोई, संजय भोई यांच्यासह अनेक मच्छीमार सहभागी होते. त्यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे हा दुर्मीळ आणि भव्य मासा पकडणे शक्य झाले. भीमा नदीच्या कुशीतून बाहेर आलेल्या या ‘जलसम्राटाने’ बेगमपूरच्या मत्स्यव्यवसायाच्या इतिहासात सुवर्णक्षण निर्माण केला असून, या घटनेची चर्चा संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे.
बेगमपुरा येथील स्थानिक मच्छीमार सिद्धू भोई म्हणतात की, “आम्ही अनेक वर्षांपासून भीमा नदीत मासेमारी करत आहोत, पण जाळ्यात तब्बल २५ किलो वजनाचा कटला मासा अडकण्याचा हा आयुष्यातील अविस्मरणीय क्षण होता. जाळे ओढताना इतका मोठा मासा मिळेल, याची कल्पनाही नव्हती. सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने हा ‘जलसम्राट’ किनाऱ्यावर आणण्यात यश आले. बेगमपूरच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या कटला माशाची नोंद झाल्याचा आम्हाला अभिमान आहे.”