प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर (फोटो- ai gemini)
प्रदूषणावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर
हवेच्या गुणवत्तेची माहिती पंधरा दिवसांपासून उपलब्ध नाही
सरकारी यंत्रणांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा
सुनयना सोनवणे / नवराष्ट्र: पुणे शहरातील प्रदूषण वाढत असताना त्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणाच ‘व्हेंटिलेटर’वर गेली आहे. एका क्लिकवर उपलब्ध होणाऱ्या हवेच्या गुणवत्तेची माहिती गेल्या पंधरा दिवसांपासून उपलब्ध नाही, प्रदूषणावर लक्ष ठेवणाऱ्या सरकारी यंत्रणांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा उघडा पडला आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी दर्शविणारी सफर आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची (एमपीसीबी) संकेतस्थळे बंद असल्याने शहराचा वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) आणि प्रदूषणाची अधिकृत माहिती सार्वजनिक पटलावरून पूर्णपणे गायब झाली आहे.
हवामान बदल, वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या, धूळ, औद्योगिक प्रदूषण आणि वाढती उष्णता यामुळे पुण्यासह राज्यातील अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा प्रश्न अधिक गंभीर बनत आहे. अशा परिस्थितीत शहरातील विविध भागांतील हवेची गुणवत्ता मोजून त्याचा डेटा सार्वजनिक करणाऱ्या या दोन्ही यंत्रणांवर हजारो नागरिक, पर्यावरण अभ्यासक, संशोधन संस्था आणि विद्यार्थी अवलंबून असतात. मात्र, संकेतस्थळे बंद असल्यामुळे सध्या पुण्यातील हवेची गुणवत्ता नेमकी काय आहे, कोणत्या भागात प्रदूषण अधिक आहे आणि नागरिकांनी कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही.
पुणे एअर ॲक्शन हबचे रवींद्र सिन्हा म्हणाले, ‘सफरच्या संकेतस्थळावरून मिळणारी दैनंदिन ‘एक्युआय’ची माहिती न मिळणे ही निश्चितच चिंतेची बाब आहे. मात्र, भविष्यात अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्याची ही सरकारसाठी एक संधीदेखील आहे. शहरात अधिक घनदाट वायू गुणवत्ता निरीक्षण केंद्रांचे जाळे उभारण्याबरोबरच त्यासाठी बॅकअप आणि खंडित न होणारी व्यवस्था विकसित करणे आवश्यक आहे. तसेच, दरवर्षी कॅलिब्रेशन प्रमाणपत्र असलेल्या कमी खर्चाच्या सेन्सरद्वारे मिळणारा वायू गुणवत्ता डेटा सरकारच्या अधिकृत पोर्टलवर प्रदर्शित करण्यास परवानगी दिल्यास नागरिकांना सातत्याने माहिती उपलब्ध होऊ शकेल.’
पर्यावरण तज्ञांच्या मते, प्रदूषणाची माहिती सार्वजनिक आरोग्यासाठी महत्त्वाची असल्याने तिची पारदर्शकता आणि सातत्य आवश्यक आहे. पंधरा दिवसांहून अधिक काळ वायू गुणवत्ता माहिती प्रणाली बंद राहणे चिंताजनक असून, त्यामुळे प्रदूषण नियंत्रण व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संकेतस्थळे तातडीने सुरू करून बिघाडाचे कारण जाहीर करण्याची मागणी होत आहे.
माहिती देण्याचेही वावडे!
या गंभीर बिघाडाबाबत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. सफर प्रणालीच्या समन्वयकांशी संपर्क साधला असता, ‘संकेतस्थळ पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी आणखी एक आठवडा लागू शकतो,’ एवढेच सांगण्यात आले. मात्र, बिघाडाचे नेमके कारण, डेटा अनुपलब्ध राहण्यामागील कारणे आणि पर्यायी व्यवस्था याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. दुसरीकडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोणताही प्रतिसाद देणे टाळले.






