फोटो सौजन्य - Social Media
पंढरपूर, (वा.) तांदूळवाडी येथे झालेल्या हृदयद्रावक अपघातात मृत्युमुखी पडलेल्या आठ जणांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर झालेल्या आर्थिक मदतीचे धनादेश व मंजुरीपत्रांचे वितरण आ. समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी दुर्घटनाग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्वास दिला.
तांदूळवाडी येथील या भीषण दुर्घटनेत एका कुटुंबातील तब्बल आठ निष्पाप जीवांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार समाधान आवताडे यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून संबंधित कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये याप्रमाणे एकूण ४० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करून घेतली.
यावेळी बोलताना आ. आवताडे यांनी सांगितले की, “कोणतीही आर्थिक मदत या कुटुंबाच्या दुःखाची भरपाई करू शकत नाही. मात्र संकटाच्या या काळात शासनाकडून दिलासा मिळावा आणि कुटुंबाला आधार मिळावा, या भावनेतून ही मदत देण्यात आली आहे. धनादेश वितरणानंतर कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच भविष्यातही आवश्यक ते सहकार्य करण्याची ग्वाही देण्यात आली.
याप्रसंगी प्रणव परिचारक, द्रोणाचार्य हाके, नगरसेवक राहुल शिंदे-नाईक, रोहित पानकर तसेच तमीम इनामदार उपस्थित होते.तांदूळवाडी दुर्घटनेनंतर शासनाकडून मिळालेल्या या मदतीमुळे दुःखाच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबीयांना दिलास्याचा हात मिळाला असून, परिसरातून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.






