सौजन्य - सोशल मिडीया
तासगाव : येत्या विधानसभा निवडणुकीत तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातून समोर कोणताही पैलवान असुदे. हा पैलवान छोटा असुदे अथवा मोठा असुदे. त्याने काही फरक पडणार नाही. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पहिला आमदार तासगाव – कवठेमहांकाळचा असेल, अशी घोषणा युवा नेते रोहित पाटील यांनी केली. यावर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी सडकून टीका केली. रोहित, हे बोलणं बरं नव्हं. तासगाव – कवठेमहांकाळ हा सुसंस्कृत मतदारसंघ आहे. इथे पैलवानकीची भाषा लोक खपवून घेणार नाहीत. लोकांना गृहीत धरू नका. अतिआत्मविश्वास बरा नव्हे, अशा खरपूस शब्दात गिड्डे यांनी रोहित पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुका येत्या ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी इच्छूक उमेदवारांची आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू आहे. तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून युवा नेते रोहित पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढदिवसाचे औचित्य साधून रोहित पाटील यांनी कवठेमहांकाळ येथे शेतकरी मेळावा घेतला. मेळाव्यास ज्येष्ठ नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी आगामी निवडणुकीत रोहित पाटील यांना शक्ती द्या, असे सांगत त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दाखवला. तर रोहित पाटील यांनी येत्या निवडणुकीत समोर कोणीही पैलवान असुदे. तो छोटा असुदे अथवा मोठा. त्याने काही फरक पडणार नाही. विधानसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा पहिला विजय तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातील असेल, असे सांगितले.
इथे पैलवानकीची भाषा लोक खपवून घेणार नाहीत
रोहित पाटील यांच्या या वक्तव्यावर भाजपने जोरदार हल्ला चढवला. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे यांनी पाटील यांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली. गिड्डे म्हणाले, ‘विधानसभा निवडणूक अजून तीन महिन्यांवर आहे. तोपर्यंत पुलाखालून खूप पाणी जाणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी रोहितला आमच्या शुभेच्छा आहेत. पण त्याने लोकांना गृहीत धरू नये. लोकांनी भल्या – भल्यांचा कार्यक्रम केला आहे. माजी खासदार संजय पाटील यांनीही दंड थोपटत पैलवानकी, वस्तादाची भाषा केली होती, मतदारांनी त्यांनाही स्वीकारले नाही’.
पाय जमिनीवर ठेवावेत, अहंकारातून बाहेर यावे
गिड्डे म्हणाले, ‘तासगाव – कवठेमहांकाळ हा सुसंस्कृत मतदारसंघ आहे. इथे पैलवानकीची भाषा लोकांना रुचत नाही. असली भाषा लोक खपवून घेणार नाहीत. मीच निवडून येणार या भ्रामक कल्पनेतून रोहित याने बाहेर यावे. कोणालाच गृहीत धरता कामा नये. रोहितसाठी आगामी निवडणूक वाटते तितकी सोपी नाही. त्यामुळे त्याने अतिआत्मविश्वास बाळगू नये. डोक्यात हवा शिरू देऊ नये. पाय जमिनीवर ठेवावेत. आपलाच विजय होईल या अहंकारातून बाहेर यावे.