मुंबई : विरोधकांवर ईडीच्या कारवाईची (ED Action) टांगती तलवार आहे. महाविकास आघाडीमधील (Mahavikas Aghadi) अनेक आमदारांना ईडीने समन्स बजावले आहे. शरद पवार गटातील आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांना बारामती अॅग्रो कंपनीशी (Baramati Agro Company) निगडीत प्रकरणावर ईडीने आज चौकशीसाठी बोलावले आहे. या प्रकरणावर भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी खोचक टीका केली आहे.
महाविकास आघाडीतील रोहित पवार, अनिल देशमुख, राजन साळवी व किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. याबद्दल बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर येत आहेत. त्यावर ईडचा तपास सुरु आहे. रोहित पवार आले, रवींद्र वायकर केव्हा येणार? असा सवाल देखील किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला. हिसाब तो देना ही पड़ेगा! अशा शब्दांमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
ईडीने का बजावले रोहित पवार यांना समन्स
रोहित पवारांनी कन्नड सहकारी साखर कारखाना अगदी कमी पैशामध्ये खरेदी केल्याचा संशय ईडीला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या वतीने राबवण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेमध्ये मूळ किंमतीपेक्षा कमी किंमतीत कारखान्यांची विक्री करण्यात आली. या प्रकरणामध्ये आमदार रोहित पवार यांचे नाव समोर आले. ‘बारामती अॅग्रो कंपनीने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या लिलावात फेरफार करुन कन्नड सहकारी साखर कारखाना अवघ्या 50 कोटी रुपयात खरेदी केला असा आरोप यापूर्वीच किरिट सोमय्या यांनी केला होता. बारामती अॅग्रो कारखान्याचा काय संबंध होता, यासंबंधीची ईडी रोहित पवारांची चौकशी करणार आहे.