शिवसेने पाठोपाठ राष्ट्रवादी ((NCP) पक्ष फुटल्यानंतर काका पुतण्या वेगळे झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार अजित पवार (AjitPawar) गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यात आले तर शरद पवार (Sharad Pawar) गटाला नवीन पक्ष स्थापन करण्यासाठी परवानगी देण्यात आली. यावरून काका पुतण्यामध्ये अनेक मतभेद सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून अजित पवार आणि रोहित पवार यांच्या शाब्दिक वाद सुरु आहेत. त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर निशाणा साधला आहे. भाजपकडून अजित पवार यांना लोकल नेता करण्यात आले आहे, त्यांनी बारामतीमध्ये अडकून राहावे ही भाजपची चाल असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे.
काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार म्हणाले, भाजपने अजित पवारांना लोकल नेता बनवलं, शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये अजित पवार काम करायचे तेव्हा ते महाराष्ट्रभर फिरायचे, पण सध्या अजित पवार बारामतीमध्ये अडकून पडले आहेत. भाजपने त्यांना लोकल नेता बनवलं आहे. शरद पवारांच्या वयासंदर्भात कायम बोललं जातं आज आमचा ७० वर्षाचा य़ुवा नेता राज्यभर ४० ते ५० सभा घेणार आहे. मात्र अजित पवार हे फक्त बारामती फिरताना दिसत आहेत. महाराष्ट्रभर अजित पवारांनी फिरू नये, बोलू नये अशी भाजपची चाल आहे. अजित पवारांसंदर्भात राज्यात नकारात्मक वातावरण भाजपने निर्माण केले आहे. त्यातच बारामतीत अजित पवारांचा उमेदवार तीन लाखांनी मागे गेल्याचे चित्र दिसून आले आहे, असे रोहित पवार म्हणाले.
सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. बारामतीच्या लोकसभा निवडणुकीच्या रींगणात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. शरद पवारांनी घरातले पवार आणि बाहेरचे पवार असे वक्तव्य केल्यानंतर अजित पवार आणि सुनेत्रा पवार त्यांना हे गोष्ट लागली आहे. शरद पवार असे बोलल्यानंतर सुनेत्रा पवार या भावूक झाल्या. त्यानंतर रोहित पवारांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला आहे. कधी राजकारणावरुन , कधी शरद पवार आणि सुप्रिया सुळेंवरुन रोहित पवार अजित पवारांवर टीका करताना दिसून आले आहे.