Maharashtra Aseembly Election 2024: भाजप खासदार अशोक चव्हाणांचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंवर हल्लाबोल; म्हणाले...
छत्रपती संभाजीनगर: राज्यात लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी देखील तयारीला लागले आहेत. संयुक्तीक आणि पक्षपातळीवर स्वतंत्रपणे निवडणुकीची तयारी केली जात आहे. दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व पक्षांची गडबड सुरू आहे. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. आरक्षणाचा प्रश्न सुटत नसल्याने मनोज जरांगे पाटील देखील निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा किंवा पाडण्याबद्दल लवकरच निर्णय घेणार आहेत. त्यातच आरोप प्रत्यारोप सुरू असतानाच भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नांदेड जिल्ह्यात आमचे मोठे नेटवर्क आहे. विधानसभेसाठी आम्ही जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महायुतीची सत्ता येण्यासाठी सर्वच जण काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी मी सर्व बैठकांमध्ये मी सहभागी होत आहे. लोकसभा निवडणुकीत जी परिस्थिती राहिली तीच परिस्थिती विधानसभा निवडणुकीला राहील असे नाही. लॉटरी एकदाच लागत असते, सारखी लॉटरी लागत नसते. प्रत्येक वेळी आपल्याला लॉटरी लागेल अशी अपेक्षा नाना पटोले यांना वाटत आहे. मात्र ते शक्य नाही.
भारतात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन झाले आहे. सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले आहेत. केंद्र सरकारचा मोठा हातभार राज्याच्या विकासासाठी होणार आहे. त्यामुळे लोक विचार करतील. लोकसभेची पुनरावृत्ती होईल असे वाटत नाही. राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण हे छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.
मी काँग्रेसमध्ये असताना प्रामाणिकपणे काम केले. नाना पटोले भाजप सोडून गेले तो दिवस काय समजला पाहिजे? नानांना माझ्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही. महायुतीच निवडणूक पुढे ढकलत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करत आहेत. यावर बोलताना अशोक चव्हाण यांनी नाना पटोले यांना कायद्याचे ज्ञान नसल्याची टीका केली आहे. काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष अशी भाषा वापरतो हे केविलवाणे वाटते. वाचनाची सवय नसल्याचे असे होते. निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याचे अधिकार निवडणूक आयोगालाच आहेत, त्यामुळे त्यावर राजकीय पक्षांनी बोलण्याची गरज नाही असे अशोक चव्हाण म्हणाले.