
पुरंदरला शिवसेना- भाजप जोमात
दोन्ही राष्ट्रवादी कुबड्यांच्या शोधात
उमेदवारीसाठी इच्छुकांची धावपळ
संभाजी महामुनी/सासवड: राज्यातील नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी आखणी सुरु झाली आहे. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. पक्ष कार्यालयात इच्छुकांच्या मुलाखतींचा कार्यक्रम सुरु आहे.
पुरंदर तालुक्यात जिल्हा परिषदेचे एकूण चार गट असून पंचायत समितीचे आठ गण आहेत. यामध्ये पक्षीय बलाबल पाहता मागील वेळी जिल्हा परिषदेच्या चार पैकी दिवे -गराडे, वीर-भिवडी आणि नीरा कोळविहीरे शिवतक्रार असे तीन गट आणि याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीचे सहा गणामध्ये सेनेचे वर्चस्व राहिलेले आहे. सध्याची राजकीय समीकरणे पाहता शिवसेनेचे सर्वच नेते आणि कार्यकर्ते याच पक्षात कार्यरत आहेत. तसेच विजय शिवतारे यांची विधानसभेत पुन्हा एकदा एन्ट्री झाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांचा विश्वास वाढला आहे. त्यादृष्टीने मोर्चेबांधणी केली जात आहे. जिल्हा परिषदेचा बेलसर माळशिरस हा गट आणि त्यांतर्गत येणाऱ्या दोन गणांत माजी आमदार संजय जगताप यांच्या कॉंग्रेसचे वर्चस्व होते.
मात्र, मधल्या काळात कॉंग्रेसचे झेडपी सदस्य दत्तात्रय झुरंगे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्टी देत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे संजय जगताप यांचा बालेकिल्ला चांगलाच ढासळला आहे. नंतरच्या काळात विधानसभा निवडणुकीत संजय जगताप यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनीही कॉंग्रेसला रामराम करीत भाजपचे कमळ हाती घेतले. दरम्यान, दत्ता झुरंगे राष्ट्रवादीकडून पुन्हा निवडणुकीच्या तयारीत असल्याने संजय जगताप यांना या गटात आपली ताकद निर्माण करावी लागणार आहे. सद्यस्थितीत तालुक्यात विजय शिवतारे यांची शिवसेना आणि भाजपाचे संजय जगताप हे दोन्ही पक्ष प्रबळ आहेत.
PCMC Election Results: महेश लांडगे ‘दादां’वर ठरले वरचढ; पिंपरी-चिंचवडमध्ये मिळवली एकहाती सत्ता
मात्र, भाजपामधील पूर्वाश्रमीचे बाबाराजे जाधवराव आणि गंगाराम जगदाळे यांची स्वतंत्र ताकद आहे. विजय शिवतारे यांना यापूर्वीच्या सर्व निवडणुकीत विविध पक्षांच्या अंतर्गत फोडाफोडीच्या राजकारणाचा प्रत्यक्ष फायदा झालेला आहे. फोडाफोडीच्या राजकारणामुळेच तालुक्यातील अजित पवार आणि शरद पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादीची वाताहत झालेली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांना शिवसेना किंवा भाजपाच्या कुबड्यां घेतल्याशिवाय उमेदवारही देता येणार नाही. एवढी बिकट अवस्था झाली आहे. भाजपचे नेते बाबाराजे जाधवराव आणि गंगाराम जगदाळे यांचे दिवे गराडे या गटात मोठी ताकद आहे.
संजय जगताप यांचा संपूर्ण कॉंग्रेस त्यांना मिळाल्याने जरी हा गट शिवसेनेच्या ताब्यात असला तरी यावेळी शिवतारे यांना चांगलेच झगडावे लागणार आहे हे निश्चित. त्याचप्रमाणे वीर भिवडी गटात शिवसेनेचे दिलीप यादव यांनी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतही विजय मिळवला होता. मात्र, नुकतेच त्यांचे निधन झाल्याने त्यांची मोठी उणीव भासणार आहे. तसेच हा गट संजय जगताप यांच्या ताब्यात पूर्वी असल्याने त्यांनी पुन्हा एकदा जोर लावण्यास सुरुवात केली आहे.
शह देण्याइतकी विरोधकांकडे ताकद
जिल्हा परिषदेच्या बेलसर माळशिरस गटात शिवसेना, भाजप यांची जोरदार रस्सीखेच सुरु असून राष्ट्रवादीचे दत्ता झुरंगे आणि शरद पवार गटाचे सुदामराव इंगळे, माणिकराव झेंडे यांची मोठी ताकद आहे. त्यामुळे या गटात निर्विवाद वर्चस्व मिळविण्यासाठी एकमेकांच्या आधाराची गरज निर्माण झाली आहे. तसेच नीरा शिवतक्रार कोळविहीरे गट शिवसेनेच्या ताब्यात आहे. मात्र सद्यस्थितीत भाजपसह अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रा. दिगंबर दुर्गाडे, दत्ताआबा चव्हाण यांचीही मोठी ताकद आहे. त्यामुळे इथेही शिवसेनेला शह देण्याइतकी विरोधकांकडे ताकद आहे.
राजकीय जुळवाजुळव केल्यास रोखणे शक्य
पुरंदर तालुक्याची एकूण परिस्थिती पाहता भाजपने आगामी जिल्हा बँक, सोमेश्वर कारखाना, नीरा मार्केट समिती, विकास सोसायट्या अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दोन्ही राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत राजकीय जुळवाजुळव केल्यास शिवतारे यांना रोखणे शक्य आहे. तसेच दोन्ही राष्ट्रवादीचे तालुक्यात कुठेतरी अस्तित्व दिसेल. मात्र आताही एकमेकांच्या पायात पाय घालणे बंद केले नाही तर मात्र दोन्ही पक्ष केवळ त्यांचे वर्धापनदिन साजरे करण्यापुरतेच उरतील, अशी परीस्थिती सध्या निर्माण झाली आहे.