फडणवीसांच्या राजकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा विजय मानला जात आहे. आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असलेल्या बीएमसीवर (BMC) गेल्या ३० वर्षांपासून असलेल्या ठाकरे कुटुंबाच्या सत्तेला फडणवीसांनी सुरुंग लावला आहे. २०१७ पर्यंत शिवसेनेचा ‘धाकटा भाऊ’ असलेला भाजप, आज मुंबईत ‘मोठ्या भावा’च्या भूमिकेत आला असून, मुंबईत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसणार आहे.
‘देवाभाऊ’ ठरले महाराष्ट्राच्या राजकारणाचे ‘चाणक्य’! “महापौर हिंदू अन्…”; CM फडणवीसांनी ठणकावलं
२०१९ मध्ये सत्ता गमावल्यानंतरही फडणवीस डगमगले नाहीत. उलट त्यांनी अधिक ताकदीने पक्ष बांधणीवर लक्ष केंद्रित केले. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन करताना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारून पक्षाची ताकद तळागाळात मजबूत केली. मुंबई आणि उपनगरांमध्ये भाजपचा प्रभाव वाढवण्यासाठी त्यांनी शांतपणे पाया रचला, ज्याचे फळ आज निकालातून मिळत आहे.
फडणवीसांनी केवळ भाजपची पारंपरिक गुजराती आणि उत्तर भारतीय मतपेढी टिकवून धरली नाही, तर त्यांनी ठाकरे कुटुंबाच्या ‘मराठी कार्ड’लाही छेद दिला. स्वतःला एक सक्षम ‘मराठी हिंदू’ नेता म्हणून सादर करत, त्यांनी मुंबईचा पुढचा महापौर मराठी असेल, हे दिलेले वचन पाळले. यामुळे दक्षिण भारतीय आणि मध्यमवर्गीय मराठी मतदारांनीही भाजपला मोठ्या प्रमाणात पसंती दिली.
या विजयाने फडणवीसांनी केवळ बीएमसीच जिंकली नाही, तर आगामी २०२९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा मार्ग सुकर केला आहे. अशक्य वाटणारे ‘मिशन मुंबई’ फत्ते करून त्यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.






