पिंपरी चिंचवड महानगरपालिका (फोटो- सोशल मीडिया)
पिंपरी-चिंचवडमध्ये १० प्रभागांत पूर्ण पॅनेल
११ प्रभागांत तीन उमेदवार विजयी
काँग्रेस, मनसे व ठाकरे गटाला एकही जागा नाही
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या (PCMC) निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) अभूतपूर्व यश मिळवत शहराच्या राजकारणावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तब्बल ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवकांच्या या महासंग्रामात भाजपने एकहाती सत्ता मिळवली असून काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आलेली नाही. या निकालामुळे शहराच्या राजकीय इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला आहे.
या निवडणुकीत भाजपचे ११ प्रभागांत चारही उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक २, ३, ४, ६, १०, ११, १५, १९, २५, २६ आणि २९ मध्ये भाजपच्या संपूर्ण पॅनेलने बाजी मारली. याशिवाय १० प्रभागांत भाजपचे तीन उमेदवार विजयी झाले. प्रभाग क्रमांक ५, ७, १२, १८, २२, २४, २७, २८, ३१ आणि ३२ या प्रभागांत भाजपने स्पष्ट आघाडी घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसला मर्यादित यश मिळाले असून ३ प्रभागांत त्यांच्या चार उमेदवारांनी विजय मिळवला. प्रभाग क्रमांक ९, २० आणि २१ मध्ये राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल विजयी झाले. तसेच २ प्रभागांत राष्ट्रवादीचे तीन उमेदवार निवडून आले. प्रभाग क्रमांक १३ आणि ३० मध्ये राष्ट्रवादीला तीन जागांवर समाधान मानावे लागले. शिवसेना (शिंदे गट) ला एका प्रभागात यश मिळाले असून प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेचे तीन उमेदवार विजयी झाले आहेत.
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप
या निकालात भाजपचे आमदार महेश लांडगे आणि आमदार शंकर जगताप यांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून आला. नियोजनबद्ध प्रचार, सातत्यपूर्ण बैठका, कार्यकर्त्यांची मजबूत यंत्रणा आणि शेवटपर्यंत केलेली मेहनत भाजपच्या फायद्याची ठरली. स्थानिक प्रश्न, विकासकामांचा लेखाजोखा आणि संघटनात्मक ताकद यांचा प्रभावी वापर प्रत्येक प्रभागात करण्यात आला. त्यामुळे मतदारांचा विश्वास भाजपकडे अधिक दृढ झाला.
विशेष म्हणजे काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकही नगरसेवक निवडून आणता आलेला नाही. शहरात एकेकाळी प्रभावी असलेले हे पक्ष यावेळी पूर्णपणे पिछाडीवर पडले आहेत. मतदारांनी विकास आणि स्थिर नेतृत्वाला स्पष्ट कौल दिल्याचे या निकालातून दिसून येते.
एकूण ३२ प्रभाग आणि १२८ नगरसेवकांच्या सभागृहात भाजपची संख्या मोठ्या फरकाने आघाडीवर असल्याने आगामी महापौर, स्थायी समिती तसेच विविध समित्यांवर भाजपचे वर्चस्व राहणार हे निश्चित आहे. या विजयामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भाजपचे स्थान अधिक मजबूत झाले असून विरोधकांसमोर आत्मपरीक्षणाचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
भाजप कार्यकर्त्यांचे आभार
या विजयाबद्दल प्रतिक्रिया देताना आमदार महेश लांडगे म्हणाले, “पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने, पदाधिकाऱ्याने आणि नेत्यांनी प्रामाणिकपणे केलेल्या मेहनतीचा हा सन्मान आहे. घराघरात जाऊन केलेला संवाद, लोकांशी निर्माण केलेला विश्वास आणि संघटनात्मक ताकदीमुळेच हे यश शक्य झाले. पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण, नियोजित आणि शाश्वत विकासासाठी भारतीय जनता पार्टी पूर्णतः कटिबद्ध असून नागरिकांनी दाखवलेला विश्वास अधिक जबाबदारीने जपला जाईल.”|
“विकासाभिमुख हिंदुत्वाच्या मुद्यावर आम्ही ही निवडणूक लढवली. स्वाभिमानी पिंपरी-चिंचवडकरांनी भारतीय जनता पार्टीच्या पाठिशी बहुमताने साथ दिली आहे. विरोधकांच्या बिनबुडाच्या आरोपांना हा कौल चपराक आहे. आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या शाश्वत विकासासाठी समर्पित भावनेतून काम करण्यासाठी मी व माझे सहकारी कटिबद्ध आहोत. निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.”
— महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.






