फोटो - ट्वीटर
जुन्नर : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूकीचे बिगुल वाजणार आहे. यामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे. महायुतीकडून यासाठी जोरदार प्रचार आणि प्लॅन तयार केला जात आहे. अजित पवार गटाने जनसन्मान यात्रा सुरु करत प्रचाराचा नारळ देखील फोडला आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच काळे झेंडे दाखवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये एकच चर्चा सुरु झाली आहे.
अजित पवार यांनी जनसन्मान यात्रा राज्यभरामध्ये सुरु आहे. आज (दि.18) अजित पवार यांचा यात्रेनिमित्त जुन्नरमध्ये दौरा आहे. यावेळी त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, शिवाजीराव आढळराव पाटील असे अनेक नेते उपस्थि आहेत. अजित पवार हे जुन्नरमध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांशी संवाद साधणार आहे. मात्र त्यापूर्वी अजित पवार यांचा ताफा भाजप कार्यकर्त्यांकडून अडवण्याचा प्रयत्न आला आहे. जनसन्मान यात्रेत भाजपच्या माजी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
नेमकं प्रकरण काय?
अजित पवार यांच्या जुन्नर येथील जनसन्मान यात्रेच्या ताफ्याला भाजप कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आशा बुचके यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी हे काळे झेंडे दाखवले. त्यांचबरोबर अजित पवार यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. जुन्नर तालुका हा पर्यटन तालुका असताना शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना डावललं जात असल्याने भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहे. मात्र अजित पवारांनी पालकत्वाची भूमिका पाळली नाही, याबाबत नाराज होत भाजप कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जुन्नरमधील महायुतीमधील ही अंतर्गत नाराजी महाग पडणारी आहे.