मुंबई : आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना सोमवारी उच्च न्यायालयाने दिलासा देत जमीन मंजूर केला. केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) कोचर दाम्पत्यांना केलेली अटक कायद्याला धरुन नसल्याचे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने दाम्पत्यांना 1 लाखाच्या हमीवर तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले.
सीबीआयने केलेली अटक आणि त्यानंतर सुनावण्यात आलेली कोठडी अयोग्य असल्याचा आरोप करत कोचर दाम्पत्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्व पक्षकारांची सविस्तर बाजू ऐकून घेऊन न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने ६ जानेवारी रोजी राखून ठेवलेला निर्णय सोमवारी जाहीर केला.
अटक मनमानी आणि बेकायदेशीर असल्याचा कोचर दाम्पत्यांना आरोप खंडपीठाने ग्राह्य धरला आणि दोघांनाही अटक करताना नियमांचे पालन करण्यात आलेले नाही, असेही निरीक्षण खंडपीठाने आदेशात नोंदवले. तसेच पासपोर्ट जमा करावा आणि आतापर्यंत तपासात करत आलेले सहकार्य करत राहावे असे निर्देशही कोचर दाम्पत्यांना दिले.
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार
उच्च न्यायालयाने कोचर दाम्पत्यांना जामीन मंजूर केला असला तरीही त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले.