
Buldhana Dhad Road Accident
माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कोलापूर येथील अंकुश जाधव हा आपल्या आई आनंदाबाई यांना घेऊन एमएच-२१/बीबी-२८४२ क्रमांकाच्या दुचाकीने बुलढाणा शहराकडे येत होता. दरम्यान, बुलढाणा ते धाड मार्गावरील शिवसाईनगरजवळ समोरून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला. या अपघातात आनंदाबाई जाधव यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अंकुश जाधव हा गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. उपचारादरम्यान मुलाचाही मृत्यू गंभीर जखमी झालेल्या अंकुशला तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले; मात्र त्याची प्रकृती चिंताजनक होती. मृत्यूशी झुंज देताना अखेर त्याचीही प्राणज्योत मालवली. आई-मुलाच्या एकाच अपघातात झालेल्या मृत्यूने जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सध्या गणेशोत्सव तसेच ज्येष्ठा गौरी पूजनामुळे सर्वत्र आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण आहे. घरोघरी पूजन, आरती आणि महाप्रसादाच्या कार्यक्रमांची धामधूम सुरू असतानाच बुलढाणा शहराजवळ घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली. कोलापूर येथील जाधव कुटुंबातील मायलेकाचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याने गावावरही दुःखाचे वातावरण निर्माण झाले आहे.