
Washim -Buldhana Diwali Festival Shopping
यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात शेतीचे आर्थिक गणित बिघडले आहे. पावसातील मोठ्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनावर परिणाम झाला, तर कापूस उत्पादक शेतकरीही अपेक्षित दराच्या प्रतीक्षेत आहेत.उत्पादन खर्च आणि उत्पन्न यांचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीच्या खरेदीवर दुष्काळाचे सावट राहण्याची शक्यता व्यापारी वर्गाकडून व्यक्त केली जात होती. मात्र, सणाचा आनंद आणि परंपरा जपण्यासाठी नागरिकांनी आपल्या आर्थिक परिस्थितीनुसार खरेदीला प्राधान्य दिल्याचे चित्र दिसून आले.
दिवाळी म्हटले की नवीन कपडे, घराची सजावट, फराळ आणि पूजेच्या साहित्याला विशेष महत्त्व असते. याच पार्श्वभूमीवर वाशिम, कारंजा, रिसोड, मंगरूळपीर, मानोरा, बुलढाणा, खामगाव, मलकापूर, चिखली आणि देऊळगाव राजा यांसह प्रमुख शहरांतील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. कपड्यांच्या दुकानांमध्ये महिला, पुरुष आणि लहान मुलांची खरेदीसाठी लगबग सुरू होती. साड्या, ड्रेस मटेरियल, रेडिमेड कपडे आणि लहान मुलांच्या आकर्षक कपड्यांना ग्राहकांकडून पसंती मिळत होती. घरासमोर आकर्षक रांगोळी काढण्यासाठी रंग, सजावटीसाठी तोरणे, फुलांच्या माळा, आकाशकंदील, पणत्या आणि विद्युत रोषणाईच्या साहित्याची खरेदीही मोठ्या प्रमाणात झाली. विविध रंगांच्या सजावटीच्या वस्तूंनी दुकाने सजली असून, बाजारपेठांना दिवाळीचा साज चढला आहे.
दिवाळीच्या सणात फराळाला विशेष स्थान असल्याने चिवडा, चकली, करंजी, लाडू, शंकरपाळे, अनारसे आदी पदार्थांच्या खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली. घरगुती फराळासोबतच तयार फराळालाही ग्राहकांची पसंती मिळत आहे. मिठाईच्या दुकानांमध्ये विविध प्रकारच्या मिठायांची आकर्षक मांडणी करण्यात आली आहे. नातेवाईक, मित्रमंडळी आणि परिचितांना मिठाई देऊन शुभेच्छा देण्याची परंपरा असल्याने खरेदीचीही धूम दिसून आली. दुष्काळाची चिंता; तरी सणासाठी हात मोकळे : यंदा शेतीतील अनिश्चितता आणि शेतमालाच्या दरांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांच्या खर्च करण्याच्या क्षमतेवर मर्यादा आल्या आहेत. विशेषतः सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करीत आहेत. त्यामुळे अनेकांनी अनावश्यक खर्च टाळून गरजेच्या वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य दिले. तरीही कुटुंबीयांच्या आनंदासाठी नवीन कपडे, फराळ आणि दिवाळीच्या सजावटीच्या वस्तूंची खरेदी करण्यात नागरिकांनी उत्साह दाखविला. बाजारपेठेतील वाढत्या गर्दीमुळे छोटे व्यावसायिक, फेरीवाले, किरकोळ विक्रेते आणि दुकानदारांना काहीसा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
दिवाळी हा छोट्या व्यावसायिकांसाठी वर्षातील महत्त्वाचा हंगाम असतो. पणत्या विक्रेते, फुलविक्रेते, फराळ विक्रेते, फेरीवाले आणि किरकोळ दुकानदारांची दिवाळीतील उलाढालीवर मोठी भिस्त असते. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे खरेदी कमी होण्याची भीती होती. मात्र, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजारपेठेत वाढलेल्या गर्दीमुळे या व्यावसायिकांनाही काहीसा दिलासा मिळाला.
खरेदीसाठी नागरिकांची संख्या वाढल्याने प्रमुख बाजारपेठांतील रस्त्यांवर वाहनांची आणि पादचाऱ्यांची मोठी वर्दळ दिसून आली. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याने वाहनधारकांची तारांबळ पार्किंगसाठी उडाली. जागा शोधताना नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, या गर्दीतही खरेदीचा उत्साह कायम होता. सायंकाळी विद्युत रोषणाईने उजळलेल्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची अधिकच रेलचेल पाहायला मिळाली. एकीकडे शेतकऱ्यांच्या घरात आर्थिक चिंतेचे वातावरण असताना दुसरीकडे दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत निर्माण झालेल्या चैतन्यामुळे व्यापारी वर्गाला दिलासा मिळाला आहे.
Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता