
photo- Ai generated
वाशिम: वाहतूक नियंत्रण आणि नाकाबंदी दरम्यान रिसोड पोलिसांनी सतर्कता दाखवत चोरीची दुचाकी जप्त केली. या कारवाईत ५० हजार रुपये किमतीची दुचाकी हस्तगत करून एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली. ही दुचाकी वाशिम शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे तपासात उघड झाले. (Washim )
बुधवारी रिसोड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस अंमलदार सुधाकर सोन्नर आणि शिवाजी केंद्रे हे वाहतूक नियंत्रण व नाकाबंदीचे कर्तव्य बजावत होते. यावेळी एका संशयित इसमासह त्याच्याकडील वाहनाची पोलिसांनी कसून चौकशी केली. तपासणीदरम्यान संबंधित दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी ५० हजार रुपये किमतीची मोटारसायकल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले. या दुचाकी चोरीप्रकरणी वाशिम शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पुढील तपासासाठी जप्त केलेले वाहन वाशिम शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. या आरोपीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, अपर पोलिस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर, पोलिस अंमलदार सुधाकर सोन्नर, शिवाजी केंद्रे, विनोद घनवट, रवी अडागळे आणि परमेश्वर भोणे यांचा समावेश होता.
६ ते १२ नोव्हेंबरदरम्यान दिवाळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराबाहेर जाताना विशेष खबरदारी घ्यावी. घरांना कुलूप लावताना मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन रिसोड पोलिसांनी केले.