
मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे 'पादचारी प्रथम' अभियान
मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास सुकर आणि सुरक्षित व्हावा यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘पादचारी प्रथम’ मोहिमेचा धडाका सुरू झाला आहे. गेल्या अवघ्या १४ दिवसांत पालिकेने शहरातील ८१ पदपथांवरील तब्बल ६८ किलोमीटरचा भाग अतिक्रमणे व विविध अडथळ्यांमधून मोकळा केला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आणि महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व २६ प्रशासकीय विभागांमध्ये ही व्यापक मोहीम राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात २०० प्रमुख पदपथांची निवड करण्यात आली असून, त्यापैकी ८१ पदपथांवरील काम पूर्ण झाले आहे.(फोटो सौजन्य – istock)
Rain Update : महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’; पुढील पाच दिवसांत 27 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस
मुंबईत दररोज घराबाहेर पडणाऱ्या एकूण नागरिकांपैकी जवळपास निम्म्याहून अधिक प्रवास पायी केला जातो. असे असतानाही पदपथांवरील फेरीवाले, साठवून ठेवलेले साहित्य, अनधिकृत बांधकामे, चढ-उतार मार्ग आणि अनधिकृत वाहनतळांमुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मुख्य रस्त्यावरून चालावे लागते. परिणामी, वाहतूककोंडी वाढण्यासोबतच अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. सन २०२३ च्या रस्ता सुरक्षा अहवालानुसार शहरातील रस्ते अपघातातील मृतांमध्ये ४४ टक्के वाटा पादचाऱ्यांचा होता. या पार्श्वभूमीवर पालिकेने रेल्वे स्थानके, भुयारी रेल्वे स्थानके, बसस्थानके, शाळा, रुग्णालये आणि बाजारपेठा अशा संवेदनशील व गर्दीच्या परिसरांना केंद्रस्थानी ठेवून पदपथ सुधारणांना गती दिली आहे.
या अभियानांतर्गत १ ते १४ ऑगस्ट दरम्यान पालिकेने ३३७ विविध प्रकारच्या कारवाया केल्या. यात ७७ अनधिकृत बांधकामे पाडण्यात आली असून ११२ अनधिकृत फेरीवाल्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. याशिवाय पदपथांना गिळंकृत करणारे रस्त्यावरील ४९ आसन- साहित्य, ६३ साठवणूक साहित्य, २७ दुकानांचे फलक, १४ मार्गदर्शक फलक आणि ४९ जाहिरात फलक जप्त करण्यात आले. चालण्यास अडथळा ठरणाऱ्या २५ अधिकृत दुकानांलगतच्या संरचना आणि आठ पदपथांची दुरुस्ती करण्यात आली, तसेच पदपथांवर थाटलेले आठ बेकायदा वाहनतळही हटवण्यात आले. केवळ अतिक्रमण हटवणे इतकाच या मोहिमेचा उद्देश नसून, पदपथांची तुटफूट दुरुस्त करून ते सलग आणि दिव्यांगस्नेही बनवण्यावर भर दिला जात आहे.
कारवाईनंतर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी पालिकेने कडक देखरेख यंत्रणा आखली आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातील किमान ९० टक्के पदपथांची दरमहा पाहणी करून ‘मार्ग’ तक्रार प्रणालीवरील तक्रारींचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.कारवाईपूर्वीची आणि नंतरची छायाचित्रे साप्ताहिक अहवालात सादर केली जाणार असून अतिरिक्त आयुक्तांमार्फत दर पंधरवड्याला या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. मोकळ्या केलेल्या पदपथांवर पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधित घटकांवर कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाईल, असा स्पष्ट इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे.
Ans: मुंबईतील पादचाऱ्यांना सुरक्षित आणि अडथळामुक्त मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून राबवण्यात येणारे हे अभियान आहे.
Ans: अभियानाच्या १४ दिवसांत मुंबईतील ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
Ans: पदपथ मोकळे असल्यास पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालण्याची गरज कमी होते. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेत सुधारणा होण्यास मदत होते.