
फोटो सौजन्य - Social Media
राज्यात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेमुळे शिक्षक आणि प्रगणकांवर मोठा कामाचा ताण निर्माण झाला असून, कडक उन्हात घराघरांत जाऊन माहिती संकलित करताना त्यांची मोठी फरफट होत असल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात पाहायला मिळत आहे. शाळांना सुट्या लागल्यानंतर जनगणना, घरगणना आणि विविध सर्वेक्षणांच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र अपुरं मनुष्यबळ, वाढतं कामाचं ओझं आणि कठीण परिस्थितीमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
तालुक्यातील अनेक प्रगणकांकडे २०० ते ४०० पेक्षा अधिक घरांची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा करणे, लोकांच्या शंकांचं निरसन करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि ऑनलाइन माहिती भरणे या सर्व प्रक्रियेमुळे शिक्षकांना प्रचंड ताण सहन करावा लागत आहे. भर उन्हात हे काम करताना अनेकांना चक्कर येणे, अशक्तपणा, डोकेदुखी यांसारख्या आरोग्याच्या समस्या जाणवत आहेत. महिला शिक्षकांनाही या कामामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं सांगितलं जात आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेचे रिसोड तालुकाध्यक्ष प्रशांत देशमुख यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. “जनगणना हे शासनासाठी आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचं काम आहे. शिक्षकांनी नेहमीच जबाबदारीने ही कामं पार पाडली आहेत. मात्र सध्याच्या परिस्थितीत अपुऱ्या मनुष्यबळामुळे शिक्षक आणि प्रगणकांवर अतिरिक्त ताण पडत आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
शिक्षक संघटनांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्या देखील केल्या आहेत. २०० पेक्षा अधिक घरांची जबाबदारी असलेल्या प्रगणकांना सहाय्यक प्रगणक द्यावेत, कामासाठी विशेष रजा मंजूर करावी, वाहतूक भत्ता तसेच विमा संरक्षण उपलब्ध करून द्यावं, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय जनगणनेच्या कामात सहभागी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची मागणीही संघटनांनी केली आहे.
शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन सद्यस्थितीची माहिती दिली असून, या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जनगणना मोहिमेचं महत्त्व अबाधित ठेवताना शिक्षक आणि प्रगणकांवरील ताण कमी करण्यासाठी प्रभावी नियोजनाची गरज असल्याचं मतही व्यक्त केलं जात आहे.