जिल्हाधिकारी कार्तिकेयन अॅक्शन मोडमध्ये; पंढरपूर पेट्रोल पंपावर अचानक धाड
पंढरपूर | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या अफवा आणि शॉर्ट सेलिंगच्या तक्रारी वाढत असताना जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी थेट मैदानात उतरून अॅक्शन मोड सुरू केला आहे. पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर त्यांनी अचानक तपासणी करत इंधन पुरवठ्याचा आढावा घेतला. तपासणीत सर्व व्यवहार सुरळीत आढळले असले तरी “कृत्रिम टंचाई आणि काळाबाजार खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला आहे.
सोलापूर जिल्ह्याला पेट्रोल डिझेल व गॅस पुरवठा करणाऱ्या बीपीसीएल एचपीसीएल व आयओसीएल या सर्व कंपन्यांनी जिल्ह्याला प्राधान्य देऊन मोठ्या प्रमाणात बदल स्टॉक उपलब्ध ठेवावा. तसेच दैनंदिन मागणीप्रमाणे जिल्ह्याच्या शहर व ग्रामीण भागात इंधन पुरवठा सुरळीतपणे ठेवणे आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी दिले
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात BPCL, HPCL आणि IOCL कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत सोलापूर जिल्ह्यासाठी किमान सात दिवसांचा बफर स्टॉक ठेवण्याचे आदेश देण्यात आले. ग्रामीण भागातही दररोज नियमित इंधन पुरवठा सुरू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या.
काही पेट्रोल पंपांवर कंपनीकडून मर्यादित विक्रीचे बंधन घातल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. यावर जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी संताप व्यक्त करत, जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय कोणत्याही विक्रेत्यावर विक्री मर्यादा लागू करू नयेत, असे स्पष्ट निर्देश कंपन्यांना दिले.
जिल्हा पुरवठा अधिकारी श्री सरडे यांनी काही पेट्रोल पंप चालकांकडून द्रव व मोठ्या प्रमाणात एकाच व्यक्तीला इंधनपुरवठा होत आहे अशा तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत तसेच बार्शी करमाळा अक्कलकोट या तालुक्यातून इंधनपुरवठा विस्कळीत झाल्याबाबत ही तक्रारी येत असल्याने या भागातील पेट्रोल पंप सुरू राहतील. या दृष्टीने कंपन्यांनी त्या ठिकाणच्या विक्रेत्यांना पुरवठा करावा असा सूचना दिल्या. जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा अनाधिकृत साठवणूकीसह काळाबाजार रोखण्यासाठी तसेच काही नागरिकाकडून, पेट्रोल विक्रेत्याकडून, पेट्रोल डिझेलचे शॉर्ट सेलिंग सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी आज पंढरपूर शहरातील एका पेट्रोल पंपावर तपासणी केली .वजन व मापे विभागाला सर्व पेट्रोल पंपांचे कॅलिब्रेशन तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कमी मोजमाप किंवा फसवणूक आढळल्यास कठोर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
इंधनाचा काळाबाजार आणि अनधिकृत साठेबाजी रोखण्यासाठी प्रत्येक तालुक्यात संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. तहसीलदार, पोलीस निरीक्षक, नायब तहसीलदार, पुरवठा अधिकारी यांचा या पथकात समावेश असून पेट्रोल पंपांवर नियमित तपासणी केली जाणार आहे.
“जिल्ह्यात पुरेसा पेट्रोल-डिझेल साठा उपलब्ध आहे. नागरिकांनी घाबरून अतिरिक्त साठवणूक करू नये,” असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे सांगितले.






