Chandrakant Patil directs Forest Department to take action against harming nature on Pune hills
पुणे : पुण्यातील अनेक भागांमध्ये वनराई आणि टेकड्या आहेत. शहराच्या या मध्यवर्ती भागामध्ये असणाऱ्या या टेकड्या शहराचा समतोल राखत आहे. तसेच अनेक पुणेकर मॉर्निग वॉकसाठी देखील जात असतात. मात्र कोथरूड मधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिले. कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी आग लागून अनेक झाडे नष्ट झाली. याची गंभीर दखल घेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी कोथरुडचे आमदार व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथील नुकसानीची गंभीर दखल घेतली आहे. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करुन, महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागातील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली. त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाईप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्या आहेत. तसेच, याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक केली आहे.
राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असून; म्हातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन कोथरूडचे आमदार आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, “टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, कोथरूड मधील टेकड्यांवर काही टवाळखोर वनसंपदेचं नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई करावी असे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राजकारणासबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
दरम्यान, या घटनेचं गांभीर्य ओळखून मंत्री चंद्रकांत पाटीलहे म्हातोबा टेकडीची पाहणी करणार आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटनांवर आळा घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्यासोबत आढावा घेणार आहेत. पुण्यातील टेकड्या आणि त्यावरील निसर्ग संवर्धनासाठी अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. या टेकड्यावर अनेक जण हे सकाळी आणि संध्याकाळी चालण्यासाठी जात असतात. मात्र त्याचबरोबर काही टवाळखोर देखील जातात. या टवाळखोराच्या उपद्रवामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होते. तसेच झाडांना व पशुंना हानी पोहचते. यापुढे यावर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.