कोल्हापूर : अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या पीकांचे खूप नुकसान झाले आहे. याची पाहणी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद दौरा केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यावरुन टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर शेतकरी हसले. उद्धव ठाकरे मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले आहेत. शेतकऱ्यांना पन्नास हजार का लाख रुपये द्यायला पाहिजे होते. तुमच्या काळात असा का निर्णय घेतला नाही. असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
पुढे ते म्हणाले, “२०१९ मध्ये जेव्हा सरकार अस्तित्वात नव्हतं, असा महिन्याभराचा काळ होता. तेव्हा शेतीही माहिती नव्हती, बांधही माहिती नव्हता, तरी अतीवृष्टीमध्ये गावोगाव फिरले, शेतावरच्या बांधावर फिरले. शेतकऱ्यांना आश्वस्त करून मागणी केली की २५ हजार रुपये हेक्टरी मदत मिळायला हवी. त्यानंतर अडीच वर्षं सरकार होतं. पण २५ हजार हेक्टरी मदत मिळाली नाही”, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
महायुतीच्या चर्चांवरही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी भाष्य केलं. भाजप, मनसे आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. असा प्रस्ताव असेल तर महाराष्ट्रात भाजपचे कोअर कमिटीचे सदस्य बसून निर्णय करतात. या विषयासाठी कोअर कमिटीची कोणतीही बैठक झालेली नाही. असा कोणताही प्रस्ताव चर्चेला आला नाही, त्यामुळे ज्या प्रस्तावाची चर्चाच नाही. त्या प्रस्तावाबद्दल मी काय बोलणार?, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं.
शंभूराज देसाई यांनी शिंदे सरकारबद्दल केलेलं विधान खरचं आहे. कारण एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस घेत असलेल्या निर्णयाबद्दल सर्वसामान्य माणूस समाधानी होत आहे. पंधरा वर्षेचं नाही तर हे सरकार पुढील अनेक वर्ष शिवसेना भाजपचे राहील. असा विश्वास चंद्रकांत पाटलांनी व्यक्त केला.