
Chandrapur News: चिमूरमध्ये ७ कोटींच्या पाणी योजनेवर प्रश्नचिन्ह! चौकशी करण्याची नागरिकांची मागणी; नेमकं प्रकरण काय?
शंकरपूर हे मोठी लोकसंख्या, जोडगावे, शाळा, महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि व्यापारी वस्ती असलेले महत्त्वाचे गाव आहे. त्यामुळे येथील नागरिकांना नियमित व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेची कामे करण्यात आली असली, तरी नागरिकांना अपेक्षेप्रमाणे पाणी मिळते का, याची प्रत्यक्ष पडताळणी करण्याची गरज व्यक्त होत आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
घरांसमोर नळजोडण्या देणे, पाइपलाइन टाकणे आणि पाण्याच्या टाक्या उभारणे एवढ्याने योजना यशस्वी ठरत नाही. या सुविधांमधून नियमित पाणीपुरवठा होतो का, पाण्याचा दाब पुरेसा आहे का आणि सर्व लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचते का, हे तपासणे महत्त्वाचे आहे. योजना अपेक्षित पद्धतीने कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी असल्यास संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे.
योजनेसाठी किती निधी मंजूर झाला, प्रत्यक्षात किती खर्च झाला, कामाची गुणवत्ता तपासण्यात आली का आणि काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र कोणत्या आधारावर देण्यात आले, याची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी करण्यात आली आहे. योजनेचे तांत्रिक व आर्थिक लेखापरीक्षण करून पाइपलाइन, मोटारपंप, पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्थेची तपासणी करावी. तसेच, नळजोडण्यांची कार्यक्षमता आणि पाण्याची गुणवत्ता यांचीही पडताळणी करावी, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
चौकशीत काम अपूर्ण असल्याचे, तांत्रिक त्रुटी किंवा निकृष्ट दर्जा आढळल्यास संबंधितांची जबाबदारी निश्चित करून नियमानुसार कारवाई करावी. तसेच, त्रुटी दूर करण्यासाठी कालमर्यादा निश्चित करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.