
Chandrapur News: चंद्रपूरात २० हजार वर्षांपूर्वीचे जीवाश्म सापडले! धानोरा येथे मोठा ऐतिहासिक शोध
प्रा. चोपणे यांच्या माहितीनुसार, येथे बायसन, हरीण, रानडुक्कर तसेच काही मानवी हाडांचे अल्प अवशेष आढळले आहेत. या जीवाश्मांचा कालखंड शेवटच्या हिमयुगाशी संबंधित प्लेइस्टोसिन युगातील सुमारे २० हजार वर्षांपूर्वीचा असू शकतो. विशेष म्हणजे या भागात पाषाणयुगीन अवजारेही सापडली असून त्या काळातील मानव या परिसरात वास्तव्य करत होता आणि वन्यप्राण्यांची शिकार करत होता, असे संकेत मिळतात.
संशोधनात सर्वाधिक प्रमाणात बायसनचे जीवाश्म सापडले आहेत. त्याशिवाय वाइल्ड बोअरचे दात, हरिणाची हाडे, तसेच मानव व इतर प्राण्यांचे अवशेष मिळाले आहेत. हे सर्व नमुने प्रा. चोपणे रॉक म्युझियममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारचे जीवाश्म प्रथमच आढळल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, सुमारे २० हजार वर्षांपूर्वी जगात हिमयुग होते. त्यानंतर तापमानवाढ होऊन हिमनद्या वितळल्या आणि मोठे पूर आले. या पुरात विदर्भ व चंद्रपूर परिसरातील अनेक प्राणी नदीत वाहून गेले. गाळाखाली दडलेल्या या अवशेषांचे हजारो वर्षांत जीवाश्मात रूपांतर झाले असावे. वर्धा नदीच्या वरोरा व चंद्रपूर तालुक्यातील काही भागात आजही नदीजन्य गाळ, रेती आणि दगडांचे थर आढळतात. त्याच भागांत पूर्वी हत्ती व इतर प्राण्यांचे जीवाश्मही सापडल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा भूशास्त्रीय वारशाच्या दृष्टीने राज्यातील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा ठरत आहे.
प्रा. चोपणे यांनी १९९५ पासून भूशास्त्रीय संशोधन सुरू ठेवले आहे. त्यांनी चंद्रपूर व वणी परिसरात १५० कोटी वर्षांपूर्वीचे स्त्रोमॅटोलाइट, ६ कोटी वर्षांपूर्वीचे डायनासोर अवशेष, २० कोटी वर्षांपूर्वीचे वृक्ष व पाने, तसेच शंख-शिंपले शोधल्याचा दावा केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये शासकीय जीवाश्म व भूशास्त्रीय संग्रहालय उभारण्याची मागणी त्यांनी केली आहे. विद्यार्थ्यांनी, संशोधकांनी आणि नागरिकांनी या नैसर्गिक वारशाचा अभ्यास करावा, संवर्धन करावे आणि पुढील पिढ्यांसाठी जतन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
बालविवाह केल्यास आता होणार कैद; महाबळेश्वर प्रशासनाचा कडक इशारा