
Chandrapur News: चंद्रपुरात दुष्काळाचे संकट, आता जनावरांच्या चाऱ्याची चिंता! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले महत्त्वाचे निर्देश
नियोजन भवन येथे कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शुक्रवारी दुष्काळी परिस्थितीत चारा पिकांची लागवड व नियोजन या विषयावर आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता जलेश सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे जिल्हा उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे आदी उपस्थित होते. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना आणि जिल्हा नियोजन समितीच्या निधीचा समन्वयातून वापर करून चारा उत्पादन वाढवावे. (फोटो सौजन्य – AI Created)
केवळ यंदाच्या दुष्काळापुरते नियोजन न करता नियमित आणि शाश्वत चारा उत्पादनाची व्यवस्था निर्माण करावी. चारा उत्पादनातून शेतकरी व पशुपालकांना अतिरिक्त उत्पन्न मिळण्याच्या संधीही शोधाव्यात, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. चारा उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान, उपलब्ध संसाधने आणि विविध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करावा. कार्यशाळेत मिळालेल्या मार्गदर्शनाच्या आधारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेटी देऊन शेतकरी आणि पशुपालकांना मार्गदर्शन करावे. यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉ. निशांत नांदेश्वर यांनी विदर्भ-मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपलब्ध योजनांची माहिती दिली. दुष्काळी व कमी पाण्याच्या परिस्थितीत ज्वारी, बाजरी, मका, नेपियर गवत आणि लसूणघास यांसारख्या चारा पिकांची लागवड, चारा संवर्धन व साठवणूक, अतिरिक्त चाऱ्यापासून मुरघास निर्मिती, कडबा कुट्टी तसेच चाऱ्याची नासाडी रोखण्याच्या उपाययोजनांवर कार्यशाळेत चर्चा करण्यात आली.
कार्यशाळेत जिल्हा उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील चारा टंचाई व्यवस्थापन व शाश्वत चारा विकास, तर डॉ. विलास गावखरे यानी चाऱ्याचे भौतिक प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. सतीश अधळते यांनी चारा व्यवस्थापन व कृषी वनीकरणाची माहिती दिली. उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश बायगुडे यांनी ग्रामीण रोजगार व आजीविका अभियानाच्या माध्यमातून चारा लागवड आणि अझोला उत्पादनाच्या संधी स्पष्ट केल्या.