
Chandrapur News: ‘स्वच्छता अधिभार’च्या नावाखाली एसटीची कमाई; चंद्रपुरात 65 दिवसांत तब्बल 58.50 लाखांची वसुली
चंद्रपूर एसटी विभागातून मागील ६५ दिवसात तब्बल २९ लाख २५ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. प्रत्येक तिकिटामागे २ रुपये या दराने विभागाने ५८ लाख ५० हजार रुपयांचा स्वच्छता अधिभार गोळा केला आहे. एवढी मोठी रक्कम जमा होत असताना चंद्रपूर मुख्य बसस्थानकासह अनेक बसस्थानकांवरील स्वच्छतेची अवस्था समाधानकारक नसल्याचे चित्र आहे.
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातून कामानिमित्त, शिक्षणासाठी तसेच विविध शासकीय कामांसाठी दररोज हजारो नागरिक एसटीचा वापर करतात. राज्य सरकारच्या ‘महिला सन्मान’ योजनेअंतर्गत महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत मिळत असल्याने महिला प्रवाशांची संख्याही लक्षणीय वाढली आहे. अशा परिस्थितीत प्रवाशांकडून अतिरिक्त अधिभार आकारला जात असताना बसस्थानकांवरील स्वच्छता, साधनगृहांची देखभाल आणि इतर मूलभूत सुविधांबाबत समाधानकारक स्थिती दिसून येत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
प्रवाशांकडून आकारला जाणारा स्वच्छता अधिभार आणि प्रत्यक्षातील स्वच्छतेची स्थिती यामध्ये तफावत दिसून येत असल्याने एसटी प्रशासनाने या निधीचा वापर अधिक पारदर्शकपणे करून बसस्थानके व बसगाड्यांची स्वच्छता सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर बसस्थानकाच्या स्वच्छतेची जबाबदारी लवकरच ‘स्मार्ट’ कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या एजन्सीकडून स्वच्छतेच्या कामाकडे अपेक्षित गांभीयनि लक्ष दिले जात नसल्याची चर्चा आहे. बसस्थानक परिसरात काही ठिकाणी कचरा साचलेला दिसून येतो, तर प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेबाबतही प्रवाशांकडून तक्रारी केल्या जात आहेत. स्वच्छता अधिभारातून मिळणाऱ्या निधीचा वापर बसगाड्या धुणे, बसस्थानक परिसर स्वच्छ ठेवणे, चालक वाहकांच्या विश्रांती कक्षांची स्वच्छता, प्रसाधनगृहांची देखभाल तसेच अन्य स्वच्छता सुविधांसाठी केला जाणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात या सुविधांची स्थिती पाहता निधीचा वापर कितपत प्रभावीपणे होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विभागात सध्या २६८ एसटी बसगाड्या कार्यरत आहेत. या बसमधून दररोज सरासरी ४५ हजार प्रवासी प्रवास करतात. परिणामी केवळ स्वच्छता अधिभाराच्या माध्यमातून विभागाला दररोज ९० हजार रुपये महसूल मिळत आहे. महिन्याला ही रक्कम लाखोंच्या घरात पोहोचत असून वर्षभरात कोट्यवधी रुपयांचा निधी जमा होण्याची शक्यता आहे.
बसस्थानकाच्या स्वच्छतेचे काम स्मार्ट कंपनीला देण्यात आले आहे. स्वच्छतेची दररोज तपासणी केली जाते. स्वच्छतेत त्रुटी आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाते. – छगन दिवसे, विभागीय नियंत्रक, चंद्रपूर विभाग