
Chandrapur News: कापूस उत्पादकांवर दुष्काळाचे संकट; उत्पादनात 35-50% घट होण्याची शक्यता, पंचनामे आणि सर्वेक्षणाला सुरुवात
खरीप २०२६ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात ४ लाख ७० हजार २७७ हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड झाली. त्यापैकी कापूस हे प्रमुख पीक असून तब्बल १ लाख ९३ हजार ९४४ हेक्टर क्षेत्र कापसाखाली आहे. धानाचे क्षेत्र १ लाख ८६ हजार ४२ हेक्टर, तर सोयाबीनचे क्षेत्र ५३ हजार ९७६ हेक्टर आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या खरीप अर्थव्यवस्थेत कापसाचे महत्त्व मोठे आहे. यंदा मात्र कापसाच्या वाढीच्या अवस्थेतच पावसाचा मोठा ताण निर्माण झाला. अनेक भागांत कापसाची पाती व फुले गळणे, बोंडांची संख्या कमी राहणे आणि पिकाची वाढ खुंटणे, अशी स्थिती पाहायला मिळत आहे. नुकत्याच झालेल्या क्षेत्रीय पाहणीत कापसाच्या उत्पादकतेत जवळपास ३५-५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
त्यामुळे लागवडीचा खर्च मोठा असताना अपेक्षित उत्पादन न मिळण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १२ तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने ‘ट्रिगर-१’ लागू झाल्याने पीक नुकसानीचे पंचनामे आणि पीक परिस्थितीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. पिकांची सद्यस्थिती, नुकसानीचे प्रमाण तसेच छायाचित्रे आणि अन्य नोंदी संकलित करून अहवाल तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
दुष्काळग्रस्त भागासाठी पीक कर्ज पुनर्गठन, कर्जवसुलीस स्थगिती आणि कृषीपंपांच्या वीजबिलात सवलतीसह विविध उपाययोजना जाहीर करण्यात आल्या आहेत. कापूस खरेदीच्या दृष्टीनेही चंद्रपूर महत्त्वाचे केंद्र आहे. २०२५-२६ हंगामात भारतीय कापूस महामंडळाने जिल्ह्यातील ५९ हजार ७४० शेतकऱ्यांकडून २ लाख ८२ हजार ७८६ गाठी कापूस खरेदी केला होता. यावरून जिल्ह्यातील कापूस अर्थव्यवस्थेचा मोठा व्याप स्पष्ट होतो.
यंदाच्या प्रतिकूल हवामानामुळे कापूस पिकावर ताण निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती संबंधित कृषी अधिकाऱ्यांना द्यावी तसेच पंचनाम्याच्या प्रक्रियेत सहकार्य करावे. कापसावरील कीड व रोगांचा प्रादुर्भाव दिसून आल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच उपाययोजना कराव्यात. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा आणि पुढील हंगामासाठी हवामान व पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन पीक नियोजन करावे. जागतिक कापूस दिन हा दरवर्षी ७ ऑक्टोबरला साजरा केला जातो आणि यंदाची अधिकृत थीम ‘कॉटन फॉर गुड’ आहे. – शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, चंद्रपूर.